संजय राऊतांना ‘मातोश्री’ डळमळीत करायची आहे का?, चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल; ‘सामना’चा संपादक बदलण्याचाही सल्ला!
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही सोमय्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. संजय राऊत यांना मातोश्री डळमळीत करायची आहे. ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सगळ्यांना माहिती आहे, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
पुणे : राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. संजय राऊत यांनीही शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत सोमय्यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच सोमय्या यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी राऊत आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही सोमय्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. संजय राऊत यांना मातोश्री डळमळीत करायची आहे. ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सगळ्यांना माहिती आहे, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
‘राऊत कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सगळ्यांना माहिती’
राज्यात सध्या जे काही चाललं आहे त्याबाबत अॅक्शनला रिअॅक्शन होतच राहणार असं म्हणावं लागेल. सगळ्यांना कुणीतरी अधिकारवाणीने सांगू शकेल अशी अराजकीय व्यक्ती राहिलेली नाही. अशावेळी मुख्यमंत्र्यांची मोठी जबाबदारी असते. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवावं, पण ते कसे बोलावणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्याचबरोबर संजय राऊत यांनी ‘मातोश्री’ डळमळीत करायची आहे का? ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हे सगळ्यांना माहिती आहे. सगळा चिवडा झाला आहे, अशी खोचक टीकाही चंद्रकांतदादांनी केलीय.
‘सामना’चा संपादक बदल्याचाही चंद्रकांतदादांचा सल्ला!
सामनामध्ये कशी भाषा वापरली जाते ते आपण पाहतोच. रश्मी वहिनी सामनाच्या संपादक आहेत. त्यांना बदला आणि अनिल परब यांना संपादक करा, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलाय. इतकंच नाही तर महाविकास आघाडीचे जे सर्वेसर्वा आहेत ते काँग्रेस आणि शिवसेनेला कटपुतळीप्रमाणे नाचवत आहेत, असा जोरदार टोला चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावलाय. नारायण राणे यांनी केलेल्या खळबळजनक ट्वीटबाबतही चंद्रकांत पाटलांनी मत व्यक्त केलंय. राणेंच्या ट्वीटबाबत माहिती नाही. पण ते केंद्रीय मंत्री आहेत. ते माहितीच्या आधारेच बोलतात, असा दावा पाटील यांनी केलाय.
इतर बातम्या :