पुण्यात भाजपकडून ‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी! Chandrakant Patil यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात पुण्यात आज होळी साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली. वाईट प्रवृत्ती जाळण्याचा दिवस म्हणजे होळी. त्यामुळे आज आम्ही 'देशद्रोही दाऊद सरकार'ची होळी करत असल्याचा टोला पाटील यांनी लगावलाय.
पुणे : राज्यभरात आज होळीचा (Holi) उत्साह आहे. सर्वसामान्य लोक, सेलिब्रिटींसह नेतेमंडळीही होळी साजरा करताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी होळीचं निमित्त साधून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला जातोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) आणि पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नेतृत्वात पुण्यात आज होळी साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली. वाईट प्रवृत्ती जाळण्याचा दिवस म्हणजे होळी. त्यामुळे आज आम्ही ‘देशद्रोही दाऊद सरकार’ची होळी करत असल्याचा टोला पाटील यांनी लगावलाय.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, होळीचा सण साजरा करताना वाईट प्रवृती जाळल्या जातात. राज्यात शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. कनेक्शन कापलं जातंय. मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहे. पुण्यात एका नेत्यानं एका मुलीवर बलात्कार केलाय. ती मुलगी सध्या गायब आहे. अशा वाईट प्रवृत्ती जाळण्याचं प्रतिक म्हणून होळी पेटवली. हे भ्रष्ट सरकार पायउतार होत नाही तोपर्यंत रोज आंदोलनं झाली पाहिजेत, हा संघर्ष सुरु राहिला पाहिजे, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडी सरकारविरोधात रान पेटवण्याचे आदेश दिले.
भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली. या होळीचे दहन केले. यावेळी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.#Holi #Pune #BJP pic.twitter.com/hcA8kV7ihe
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 17, 2022
‘संजय राऊतांवर काही बोलायचं नाही हे ठरवलंय’
चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी संजय राऊत यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी संजय राऊत यांच्याबद्दल बोलण्यात काही पॉइंट नाही. त्यामुळे त्यांच्यावर काही बोलायचं नाही असं ठरवलं आहे, असा खोचक टोला चंद्रकांतदादांनी लगावलाय.
‘लोकांना कळू द्या कोण कुणाच्या बाजूने’
तर ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, या देशाचा खरा इतिहास तरुणाईला सांगावा लागेल. तुम्ही टॅक्स फ्री करणार नसाल तर आम्ही आमच्या पैशाने दाखवू. तुम्ही सत्य फार काळ दाबून ठेवू शकत नाही. झाकून ठेवू शकत नाही. वळसे पाटील किंवा संजय राऊत चित्रपटावर टीका करत आहे हे लोकांच्या भावना प्रक्षुब्ध होण्यासाठी चांगलं आहे. लोकांना कळू द्या की कोण कुणाच्या बाजूने आहे.