पोलीस भर्तीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, हजारो जागांसाठी भरतीची घोषणा
पोलीस भर्तीचं स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी...

अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पोलीस खात्यात भर्ती व्हावं. खाकी वर्दी आपल्या अंगावर असावी, असं अनेक तरुणांचं स्पप्न असतं. असंच पोलीस भर्तीचं (Police Recruitment) स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. हजारो जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मृतीचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) बोलत होते.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्मृतीचिन्हाच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. यात कोविड कालावधीत निधन झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांना मदत निधीचं वाटप करण्यात आलं. प्रत्येक कुटुंबाला पोलीस दलातर्फे 50 लाखांची मदत देण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पालकमंत्री म्हणून पुणे पोलिसांचं कौतुक करावं वाटतं. पोलीस क्वार्टर्सची दयनीय अवस्था झाली आहे, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जिल्हा नियोजन समितीमधुन पोलीस कल्याण निधी वाढव्याचा मी प्रयत्न करणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
गावातील पोलीस पाटलांचं काम अतिशय महत्वपूर्ण आहे. गाव आणि पोलीस यांच्यामधील दुवा म्हणजे पोलीस पाटील. कोरोना काळात पोलीस पाटलांनी महत्वाचं काम केलं. लोकांना जागरूक केलं. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
याच कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्राचं कौतुक केलं, त्यांच्या व्यंगचित्राने समाजात जागरूकता निर्माण केली.कॉमन मॅन त्यांच्या व्यंगचित्रांच्या केंद्रस्थानी राहिला. आर के लक्ष्मण व्यंगचित्रामुळे अमर झाले. आजही त्यांची अनेक व्यंगचित्र वृत्तपत्रात छापून येतात. जवळपास 70 वर्ष त्यांनी हे काम केलं आहे.हे सगळं अजरामर आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.