Chandrakant Patil on Fadnavis : ‘देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील’, चंद्रकांत पाटलांचा दावा; मनसेसोबत युतीचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट
पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. 'देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील, असा दावाच पाटील यांनी केलाय. आजरा इथल्या विकास संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याबाबत आतापर्यंत अनेकदा दावे केले, तारखा दिल्या. त्यावरुन विरोधकांनीही चंद्रकांत पाटलांची चांगलीच खिल्ली उडवली. तरीही चंद्रकांत पाटील यांचं सरकार कोसळण्याबाबतची वक्तव्ये सुरुच आहेत. आता पुन्हा एकदा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. ‘देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील, असा दावाच पाटील यांनी केलाय. आजरा इथल्या विकास संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. त्याबाबत पाटील यांनाच विचारलं असता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल मी आशावाद व्यक्त केला. माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल आशावाद व्यक्त करणे यात काय चूक? असा सवालही त्यांनी केलाय.
चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही अनेकदा महाविकास आघाडी सरकार कोसळण्याबाबत वक्तव्ये केली आहेत. इतकंच नाही तर त्यांनी त्याबाबतच्या तारखाही दिल्या होत्या. तर कोल्हापुरातून मी हरलो तर हिमालयात निघून जाईन, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. मात्र, कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांना हिमालयात जाण्याचा खोचक सल्ला देण्यात आला. तसंच त्याबाबत अनेक विनोद आणि मिम्सही सोशल मीडियावर फिरत होते. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटलं आहे.
‘मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नाही’
राज ठाकरे यांच्या सभेवरुनही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली नसती तरी सभा झाली असती. राज ठाकरे यांचे अस्तित्व धोक्यात येईल असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांनी आधी स्वत:च्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी. तसंच मनसेसोबत युती करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलाय.
वाहतुकीचे नियम आणि दंडावरून पाटलांचा संताप!
चंद्रकांत पाटील यांना वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल मोठा दंड लावण्यात आला आहे. त्याबाबत विचारलं असता कोल्हापूर-पुणे महामार्गावर अनेक कॅमेरे लावले आहेत. त्यावेळी थोडा वेग वाढला की लगेच दंड केला जातो. मी साडे बारा हजाराचा दंड भरलाय. आताचा दंडही भरला आहे. रस्ते चांगले झाले मग नागरिकांनी गाड्या चांगल्या घेतल्या. त्याला आता स्पीड लिमिट लावलं जातं. अशा दंडामुळे घरं दारं विकायची वेळ येईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय.
पाटील पवारांच्या मताशी सहमत!
राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आपण सहमत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. राजद्रोह, देशद्रोहाचा गुन्हा कशाही वेळी लावला जातो. ‘मातोश्री’च्या समोर हनुमान चालिसा म्हणण्याचा संकल्प हा राजद्रोह कसा काय होऊ शकतो? सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून हे संपवलं पाहिजे, असंही पाटील यावेळी म्हणाले.