MLC Election 2022: सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून निवडून कसे येणार? चंद्रकांत पाटील म्हणतात, “सद्सदविवेकबुद्धीला स्मरुण…”
"सदाभाऊ खोत यांना भाजपचा पाठिंबा असेल. ते जरूर निवडून येतील. सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांसह सदाभाऊंना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेत.
मुंबई : “सदाभाऊ खोत यांना भाजपचा पाठिंबा असेल. ते जरूर निवडून येतील. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. शेतकऱ्यांतचे प्रश्न ते हिरीरीने मांडतात. त्यांचा विधीमंडळातील सहभाग हा राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व असेल. त्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठीही आझाद मैदानावर आंदोलन केलं. त्यामुळे त्यांच्यासारख्या रणझुंजार नेत्याचं विधीमंडळात असणं राज्याच्या हिताचं आहे, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांसह सदाभाऊंना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणालेत.
विधान परिषद निवडूक आणि त्यासाठीची सर्वच पक्षांकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काल भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांचं नाव नव्हतं. यामुळ राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. पंकजा यांनी पक्षासाठी केलेलं काम आणि सदाभाऊ खोत यांनी केलेली आंदोलनं याची भाजपकडून दखल घेण्यात आली नाही. त्यांना डावलण्यात आलं अशी चर्चा झाली. त्यानंतर अखेर सदाभाऊ खोत हे अपक्ष निवडणूक लढतील आणि त्यांना भाजपाच पाठिंबा असेल असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.
मध्यंतरीच्या काळात सदाभाऊ खोत यांनी आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिंबा दिला होता. पण त्याचं रस्त्यावर उतरणं, आंदोलनं करणं या सगळ्यामुळे त्यांनी विधानपरिषदेवर पाठवलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र कालच्या पाच उमेदवारांच्या यादीत त्यांना स्थान नसल्याने सदाभाऊंचे समर्थक नाराज होते. अखेर सदाभाऊ यांनी आज आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे आणि त्यांना भाजपचा पाठिंबा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलंय.
भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार
भाजपने आपल्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विधानपरिषदेचे सध्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं नाव आहे. तसंच माजी आमदार, भाजप नेते राम शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे. ते याआधी कर्जत जामखेड या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केलाय आता त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी भाजपने केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना OSD असणारे श्रीकांत भारतीय यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच आक्रमक महिला नेत्या उमा खापरे यांनी प्रसाद लाड यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.