कोथरुडमध्ये साडीवाटप, महिलांची तुडुंब गर्दी, चंद्रकांत पाटील म्हणतात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत डबेवाले आणि घरगड्यांना फराळ वाटला. त्यामुळे मीही जुन्या नाही, तर नवीन साड्या वाटल्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुणे : कोथरुडमधील नवनिर्वाचित आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक भागात महिलांना साड्यांचं वाटप केलं. साड्या घेण्यासाठी कोथरुड भागात महिलांची तुडुंब गर्दी झाली होती. मात्र एक लाख साड्या हा आकडा चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Saree Distribution) यांनी दिलं.
‘निवडणुकीनंतर दिवाळी आली आहे. विशेष म्हणजे भाऊबीज असल्यामुळे कोथरुडमधील धुणं भांडी करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना साडी वाटप करण्याचा माझा मानस होतं. नागरिकांनाही मी साडी वाटप करण्याचं आवाहन केलं होतं’ असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.
नरेंद्र मोदींनी गरीबांसोबत दिवाळी साजरी करण्याचं देशाला आवाहन केलं होतं. लक्ष्मीपूजनाला महिलांचा सन्मान करण्यास सांगितलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत डबेवाले आणि घरगड्यांना फराळ वाटला. त्यामुळे मीही जुन्या नाही, तर नवीन साड्या वाटल्या, असं पाटील म्हणाले.
धाकधूक वाढली, चंद्रकांत पाटील दगडूशेठ गणपतीच्या चरणी
‘याआधी, वाढदिवसालाही मी पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तूंऐवजी ड्रेसचं कापड देण्याचं आवाहन मी केलं होतं. मराठवाड्यातील गरीब महिलांना 35 हजार ड्रेसची कापड आणि 5 हजार पावसाळी बूट वाटप मी केलं होतं. दहा हजार साड्या जमल्याचा अंदाज आहे. एक लाख हा चुकीचा आकडा आहे. निवडणूक आता संपलेली आहे. मतांसाठी काहीही करण्याचा प्रश्नच येत नाही, असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil on Saree Distribution) म्हणतात.
चंद्रकांत पाटील यांना साड्या वाटप करु देणार नाही, असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला होता. पाटलांनी दिलेल्या साड्या न स्वीकारण्याचं आवाहनही मनसेने जनतेला केलं होतं.
25 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत चंद्रकांत पाटील कोथरुड मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीने आपला उमेदवार न देता शिंदेंनाच पाठिंबा दिला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी किशोर शिंदे यांच्यासाठी घेतलेल्या सभेतही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. आमचा किशोर ‘चंपा’ची चंपी करेल असा निशाणा राज ठाकरेंनी साधला होता. मात्र त्यांच्या सभांचा फारसा परिणाम झालेला दिसून आला नाही.