कोल्हापुरात भगवा फडकला, बाळासाहेब असायला हवे होते : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : शिवसेना आणि भाजपने राज्यातील 42 मतदारसंघांमध्ये वर्चस्व कायम राखलंय. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. कोल्हापुरात शिवसेनेचा भगवा फडकवणं हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न आज पूर्ण होत असल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. शिवाय आज बाळासाहेब असायला हवे होते, असंही ते […]
कोल्हापूर : शिवसेना आणि भाजपने राज्यातील 42 मतदारसंघांमध्ये वर्चस्व कायम राखलंय. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्हीही जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. कोल्हापुरात शिवसेनेचा भगवा फडकवणं हे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न आज पूर्ण होत असल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. शिवाय आज बाळासाहेब असायला हवे होते, असंही ते म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले आणि कोल्हापूर हे दोन मतदारसंघ आहेत. हातकणंगलेमधून शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी स्वाभिमानीच्या राजू शेट्टींचा पराभव केलाय. तर कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांवर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी मात केली. या विजयानंतर कोल्हापुरात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
हातकणंगलेत राजू शेट्टी हे गेल्या दोन टर्मपासून खासदार होते. पण माने कुटुंबाने पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व निर्माण केलंय. राज्यातील काही अपवाद वगळता जवळपास सर्वच मतदारसंघात युतीचं वर्चस्व पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील हे बारामती मतदारसंघात तळ ठोकून होते. पण पवारांना बारामतीत विजयाविषयी धाकधूक वाटावी हाच आमचा विजय असल्याचंही ते म्हणाले. शिवाय बारामतीकरांना जी आश्वासने दिली, ती यापुढेही पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले.
सोलापुरात भाजपचा विजय
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांना पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागलाय. भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी दीड लाखांपेक्षा जास्त फरकाने विजय मिळवला. 50 हजार मतांची मोजणी बाकी असतानाच जयसिद्धेश्वर स्वामी 1 लाख 47 हजार 756 मतांनी आघाडीवर होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरात तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.
50 हजार मतांची मोजणी बाकी असताना जयसिद्धेश्वर यांनी 4,98,752, सुशील कुमार शिंदे 3,50,996 आणि प्रकाश आंबेडकरांनी 160736 मते मिळवली होती. जयसिद्धेश्वर यांनी सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली. सोलापुरातून प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराला तगडं आव्हान देतील असा अंदाज लावला जात होता. पण त्यांना थेट तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातूनही लढत आहेत. तिथेही ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.