सत्ता कुणाचीही येऊ द्या, ‘पाटील’ नेहमी टॉपला असतात : चंद्रकांत दादा
सरकार युतीचं असो किंवा आघाडीचं दोन्ही पाटील हे नेहमी टॉपला असतात, त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी दोघांनी प्रयत्न केले पाहिजेत, असंही आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं.
कोल्हापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात सतेज पाटील हेच मुख्यमंत्री सांभाळायचे, असं गमतीशीर वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. सरकार युतीचं असो किंवा आघाडीचं दोन्ही पाटील हे नेहमी टॉपला असतात, त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी दोघांनी प्रयत्न केले पाहिजेत, असंही आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं.
कोल्हापुरात व्हिजन 2025 हा प्रेस क्लबचा कार्यक्रम होता. त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सतेज पाटील यांच्याशिवाय त्यांचे पान देखील हलायचं नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. सरकार युतीचं आलं किंवा आघाडीचं आलं तरी दोन्ही पाटील टॉपला जातात. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी दोघांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच बरोबर त्या-त्या क्षेत्रात जे जे तज्ञ आहेत, त्यांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत, असंही के म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या फटकेबाजीला सतेज पाटील यांनीही उत्तर दिलं. तुमचं सरकार आलं तर तुम्ही प्रयत्न करा, आमचं सरकार आलं तर मी प्रयत्न करतो, असं वक्तव्य सतेज पाटील यांनी देखील केलं. त्यामुळे या व्हिजन 2025 कार्यक्रमात नेत्यांची जोरदार राजकीय बॅटिंग पाहायला मिळाली.
सतेज पाटील काँग्रेसचे नेते असले तरी त्यांची भाजपशी जवळीक आहे. पृथ्वीराज यांच्या मंत्रिमंडळात सतेज पाटील यांच्याकडे गृहराज्यमंत्रिपद होतं. पण कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचं वैर आहे. या निवडणुकीत आघाडी धर्म मोडत सतेज पाटील यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाडण्याची भूमिका घेतली आणि शिवसेनेला मदत केली. परिणामी शिवसेनेचे संजय मंडलिक हे भरघोस मतांनी निवडून आले आणि कोल्हापुरात शिवसेनेने भगवा फडकवला.