गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिल्यास ‘मातोश्री’वर कॅमेरे लागतील, चंद्रकांत पाटलांचा ‘प्रेमळ’ सल्ला
गृहमंत्र्यांकडे सगळं असतं. तुम्ही सगळंच देऊन टाकलं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलंत, तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील' असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.
रत्नागिरी : गृहमंत्रिपद तरी राष्ट्रवादीला देऊ नका, नाहीतर ‘मातोश्री’वर सीसीटीव्ही कॅमेरे लागतील, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. महाविकासआघाडीत मंत्रिपदाच्या वाटपावरुन चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला (Chandrakant Patil Suggests Uddhav Thackeray).
‘काय करावं हे उद्धव ठाकरेंनी ठरवावं, पण खूप वर्ष आम्ही एकत्र काम केलंय, म्हणून माझं व्यक्तिशः प्रेम आहे त्यांच्यावर. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला देऊ नका. ओ, काहीच ठेवत नाही तुम्ही हातामध्ये. गृहमंत्र्यांकडे सगळं असतं. तुम्ही सगळंच देऊन टाकलं गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलंत, तर मातोश्रीवर कॅमेरे लागतील’ असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.
‘तुम्ही फायनान्स (अर्थ) देऊन टाकलं, रेव्हेन्यू (महसूल) दिलं, पीडब्ल्यूडी (सार्वजनिक बांधकाम) दिलं, मग ठेवलं काय? फक्त मुख्यमंत्रिपद? बाकी तुमच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं?’ असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
यू टर्न म्हणजे यूटी, उद्धव ठाकरे. मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीत घूमजाव करतात, असा पुनरुच्चारही चंद्रकांत पाटलांनी केला. ‘उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं हतं. मात्र त्यांनी केवळ दोन लाख रुपयांपर्यंतच कर्जमाफीची घोषणा केली. काही मर्यादा असतात, याची आम्हाला जाणीव आहे. पण आता त्यांना घोषणा आणि अंमलबजावणी यातला फरक समजला असेल, ‘यू टर्न’ आता ‘उद्धव ठाकरे टर्न’ नावाने ओळखला जाईल, असं चंद्रकांत पाटील दोनच दिवसांपूर्वी म्हणाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली.
ठाकरे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची यादी तयार झाली असून काँग्रेसमध्ये मंत्र्यांची यादी आणि हायकमांडची मान्यता मिळण्यात विलंब होत असल्याचं बोललं जातं. त्यातच काँग्रेसने शिवसेनेकडील उद्योग मंत्रालयाची मागणी केल्याचीही चर्चा होती. मंत्रिमंडळ खातेवाटपात शिवसेनेने गृह मंत्रालय वगळता सर्व महत्त्वाची खाती राष्ट्रवादी-काँग्रेसला देऊन टाकल्याने चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil Suggests Uddhav Thackeray) त्यांची टेर खेचली.