पवारांसमोर शेलार म्हणाले, मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, चंद्रकांतदादा म्हणतात, विरोध नाही, पण…..

| Updated on: Nov 20, 2020 | 6:53 PM

महिला मुख्यमंत्र्यांचं सरपंचासारखं व्हायला नको. सरपंच महिला आणि गाव नवरा चालवतो" अशी शेरेबाजी चंद्रकांतदादांनी केली

पवारांसमोर शेलार म्हणाले, मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, चंद्रकांतदादा म्हणतात, विरोध नाही, पण.....
Follow us on

पुणे : महिला मुख्यमंत्री होण्याला विरोध नाही, पण सरपंचाप्रमाणे महिला पदावर आणि पती गाव चालवतो, असं व्हायला नको, अशी मिष्किल टिप्पणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व्यक्त केली होती. (Chandrakant Patil supports Women Chief Minister of Maharashtra)

“येत्या काळात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. माझा महिला मुख्यमंत्री होण्याला विरोध नाही, आमचाही त्याला पाठिंबा असेल. मात्र महिला सरपंचासारखं व्हायला नको. सरपंच महिला झाली आणि गाव नवरा चालवतो” अशी शेरेबाजी चंद्रकांतदादांनी केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रस्ताव चालेल का? असं विचारलं असता “कर्तृत्ववान महिला, जिचा क्लेम आहे, अशा महिलेचा प्रस्ताव कुणालाही मान्य होईल” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुण्यात ‘ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन’तर्फे आयोजित नवदुर्गा सम्मान सोहळ्यात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्यासह जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

“वीज बिलाबाबत सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यामुळे सोमवारी वाढीव वीज बिलाची होळी हा कार्यक्रम करणार आहोत. झेपत नव्हतं तर कशाला घेतलं डोक्यावर, आम्ही बरोबर निपटल असतं. रिकव्हरी केली तर इंटरेस्ट वाढला होता, पण वाढीव बिल नाही पाठवली. सरकारचं नाचता येईना अंगण वाकडं असं झालं आहे.” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

“विज बिलाबाबत गाढवपणा लपून ठेवणार असाल, तर कसं चालणार. सत्ता तुमच्या डोक्यात चालली आहे. लोक मतदानाची वाट पाहत आहेत. 11 महिन्यात किती चौकशा लावल्या? चौकशा लावा, अहवाल काढा आणि कारवाई करा. देवेंद्र फडणवीस यांनी एकही शेतकरी कनेक्शन कट नाही केलं. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना फुकटची सत्ता मिळाली आहे” असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.

“कोरोना काळात माणुसकीचे दर्शन घडले. कोरोनामुळे आजपर्यंत न बघितलेलं संकट अनुभवायला मिळालं. या सगळ्या काळात पत्रकारांनी लोकांसमोर नीट चित्र आणायचा प्रयत्न केला, सरकारवर दबाव ठेवला. या काळात पत्रकारांना सुरक्षितता देण्याची गरज आहे. काही पत्रकारांचा जीव गेला, मात्र सरकारने त्यांना परिवार म्हणून मदत करण्याची गरज होती. ‘टीव्ही 9’ ने चांगले काम केलं. पुण्यातील दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये दिले. त्यांचे अभिनंदन” असे उद्गारही चंद्रकांत पाटलांनी काढले. (Chandrakant Patil supports Women Chief Minister of Maharashtra)

आशिष शेलार काय म्हणाले होते?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे (Vijay Chormare) यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ (Kartutvavan Maratha Striya) या पुस्तकाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शेलार यांनी पवारांसमोरच कर्तृत्वान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. “संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं,” असं शेलार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार

(Chandrakant Patil supports Women Chief Minister of Maharashtra)