पक्षविरोधी कारवाया खपवून घेणार नाही, मुंडे-खडसेंच्या हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटील कडक पवित्र्यात

| Updated on: Dec 13, 2019 | 12:31 PM

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावरील हल्ले पचवून परतलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, पक्षशिस्तीसाठी कडक पावलं उचलण्याचं ठरवलेलं दिसतंय.

पक्षविरोधी कारवाया खपवून घेणार नाही, मुंडे-खडसेंच्या हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटील कडक पवित्र्यात
Follow us on

सोलापूर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावरील हल्ले पचवून परतलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, पक्षशिस्तीसाठी कडक पावलं उचलण्याचं ठरवलेलं दिसतंय. कारण पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला. ते सोलापुरात बोलत होते. पक्षात काही मतभेद असतील, अडचणी असतील तर पक्षातील नेत्यांशी बोला, आपण त्यातून मार्ग काढू. पण रोज उठून पक्षाविरोधी कारवाया करत असाल तर गय केली जाणार नाही, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावून चंद्रकांत पाटील काल सोलापुरात आले. आज त्यांनी सोलापुरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून, पक्षवाटचालीबाबत चर्चा केली.

कार्यकर्त्यांना इशारा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “विधानसभेत आपण पाहिले असेल, कोणाचीही गय केली गेली नाही. आता केंद्रापासून अर्थात दिल्लीपासून गल्लीपर्यंत वातावरण खूप कडक आहे. पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पक्षात बक्षीसही मिळेल आणि शिक्षाही मिळेल”

शरद पवारांवर ईडीची चौकशी लावल्यामुळे मराठा समाज एकवटला आणि त्यांचा विजय झाला असा समज चुकीचा आहे. त्याउलट आपण एकीने वागलो नाही त्यामुळे आपला पराभव झाला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. हे सरकार देखील जास्त काळ टिकणार नाही, मात्र जितके दिवस राहतील तितक्या दिवसात महाराष्ट्राची वाट लावतील, असा हल्लाबोलही त्यांनी केला.