राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करा, भाजपच्या बड्या नेत्याची मागणी
सध्या सत्ता नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत, असं टोला बावनकुळे यांनी लगावला.
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. पुण्यात आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात एका भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने (BJP leader) विनयभंगाची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांमार्फत आव्हाड यांच्यावर 354 चा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळीच राजीनामा देणार असल्याचं ट्विट केलंय. मात्र आव्हाड हे नौटंकी करत आहेत. हि्ंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावाने आपला राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. शरद पवार आणि पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावे. सुप्रिया सुळे यांनी जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करू नये, आम्ही अब्दुल सत्तारांचे कधी समर्थन केले नाही, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय.
विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यावर जे असं होतच असतं… असं म्हणतायत त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत… ७२ तासांच्या सर्व गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यानुसारच हे गुन्हे दाखल झाले आहेत…तुम्ही रंगारी करात महाराष्ट्रात… भाजपात असे चालणार नाही. आताचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नाहीत, देवेंद्र फडणवीस आहेत.. अजित पवार आणि शरद पवार यांनी व्हिडिओ पहावा आणि जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करावं, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
मध्यावधी निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 जागापण येणार नाहीत. सध्या सत्ता नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत, असं टोला बावनकुळे यांनी लगावला.
महाराष्ट्रात शिंदे आणि भाजप एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत. बारामतीत शरद पवार यांची 60 वर्षे सत्ता होती. म्हणजे काही उपकार नाही केले. गावात त्यांची दहशत होती, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय.