मुंबई : काँग्रेसच्या एका व्हीडिओवर भाजपने आक्षेप घेतला आहे. तो व्हीडिओ डिलीट करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. शिवाय काँग्रेसने जाहीर माफी मागावी, असंही भाजपने म्हटलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे.
काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात भारत जोडो यात्रेसह कर्नाटक निवडणूक आणि इतर ठिकाणीचे राहुल गांधी यांचे व्हीडिओ आणि फोटो यात आहेत. याला बँगराऊंड म्युझिकही लावण्यात आलं आहे. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. एक-एक करून सगळे गड जिंकायचेत. सगळ्या दुश्मनांशी लढून प्रत्येक मैदान जिंकायचं आहे, असं कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आलं आहे.
एक-एक करके सब गढ़ जीते,
हर दुश्मन से लड़ रण जीते…? pic.twitter.com/fk7l8FD6uh— Congress (@INCIndia) May 23, 2023
चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या व्हीडिओवर आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना राहुल गांधी करणं योग्य नाही. शिवरायांसमोर राहुल गांधी हे मायनस झिरो झिरो आहेत. तातडीने काँग्रेस पक्षाने हा व्हीडिओ सर्व माध्यमांवरून डिलीट केला पाहिजे. तातडीने देशाची आणि शिवप्रेमींची माफी मागीतली पाहिजे. जर हा व्हीडिओ डिलीट केला नाही तर महाराष्ट्रभर आंदोलनं करू, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या या आरोपांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारी व्यक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन चालणं जर भाजपच्या दृष्टीने योग्य नसेल. तर काँग्रेस पक्ष शिवरायांचा विचार महाराष्ट्रासह देशात रुजवण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केला आहे, असं नाना पटोले म्हणाले.
राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरही नाना पटोले यांनी टीका केली आहे. काळी टोपी घातलेली भगतसिंग कोश्यारी नावाची व्यक्ती शिवरायांबद्दल जे बोलली ते भाजपला मान्य आहे का? कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला तेव्हा तुमचं तोंड का बंद होतं?, असा सवाल नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.