राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करा, भाजप आक्रमक, चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसवर भडकले!
राहुल गांधी यांनी या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींवर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपूरः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्या प्रकारे शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे, ते पाहता एक दिवस ते स्वतः सावरकरांबद्दल आज राहुल गांधी (Rahul Gandhi) जे बोलतायत, तसंच वक्तव्य करतील, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केललेल्या वक्तव्यानंतर भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलनं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यावर जोरदार टीका केली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेस पक्षावर सणकून टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करतायात, त्याचं समर्थन काँग्रेस पक्ष करत आहे. स्वातंत्र्याचा इतिहास माहित असूनही तो दडपून टाकत काँग्रेसने आज आपली या देशाविषयी घृणा निर्माण केली आहे. हा देश त्यांना कधी माफ करणार नाही. जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी जे काही एक-दोन टक्के या यात्रेतून कमावलं होतं. ते या वक्तव्यानंतर गमावलं आहे.
उद्धव ठाकरेंना टोला लगावताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ राजीव गांधी यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला उद्धव ठाकरे आदरांजली वाहतात. पण राहुल गांधी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी कुठेही त्यांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं दिसून आलं नाही, हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवून दिलं. त्यांच्याबद्दल चार शब्दही ते बोलले नाही….
उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष काँग्रेसला वेठीस धरला आहे. सावरकरांबद्दल असं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भारत जोडो यात्रेवर बहिष्कार टाकायला हवा होता. पण त्यांनी आदित्य ठाकरेंना तिथे पाठवलं. एक दिवस उद्धव ठाकरे काँग्रेससारखंच बोलतील, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
राहुल गांधींनी देशाचा अपमान केलाय. सावरकरांबद्दल त्यांचं हे वक्तव्य कुणीही सहन करू शकणार नाही. भाजप याचा तीव्र निषेध करणार आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींवर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.