देवेंद्र फडणवीस स्पायडरमॅन!! अजित पवारांनाच सुनावलं, कुणी केली कामाची स्तुती?
अजितदादांनी फडणवीसांची बरोबरी करू नये, असा सल्लाही भाजप नेत्याने दिला आहे.
नागपूरः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिंदे-भाजप (Shinde-BJP) सरकारमध्ये एक दोन नाही तर तब्बल सहा खाती घेतल्याने विरोधकांकडून वारंवार टीका होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा बोलून दाखवल्याने भाजप नेत्याने त्यांना चांगलंच सुनावलंय. देवेंद्र फडणवीस उत्तम काम करत असून ते स्पायडरमॅनप्रमाणे भूमिका बजावत आहेत. अजित पवारांना याबाबत बोलण्याचा अधिकारच नाही, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावलंय.
नागपुरात बोलताना ते म्हणाले, ‘ अजितदादांना हे बोलायचा अधिकारच नाही. जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली तेव्हा सत्तेचे सगळे फळं अजितदादांनी चाखले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा, वित्तमंत्री अजित दादा, विरोधी पक्ष नेते अजितदादा. जयंत पाटीलांनी प्रदेशाध्यक्ष रहायचं…
खरं तर विरोधी पक्ष नेते जयंत पाटलांना का नाही केलं? तुम्ही सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हेच तुम्ही करत आला आहात. विरोधी पक्षनेते पदही स्वतःकडे ठेवलं. फडणवीसांची बरोबरी करू शकत नाहीत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.
अजित पवारांना उद्देशून ते म्हणाले, ‘ आधी स्वतःबद्दल विचार करा. आपल्या पक्षाचं बघितलं पाहिजे. देवेंद्र जी उत्तम पद्धतीने स्पायडरमॅनप्रमाणे काम करत आहेत. अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलून तोंडाच्या वाफा कमी केल्या पाहिजेत..
करेक्ट कार्यक्रम करणार…
विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी बारामतीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. बारामतीत घड्याळ बंद पाडणार, करेक्ट कार्यक्रम करणार, अशा वल्गना केल्या जातात. मात्र बारामतीत आमचं काम बोलतं, त्यामुळे तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल, अशी शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रत्युत्तर दिलंय.
संपूर्ण लोकसभेत अजित दादा आणि त्यांच्या वागण्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. माझी जशी एंट्री झाली, तशी अजित दादांना भीती वाटतेय. त्यांच्यात सामना करण्याची हिंमत नाही. २०२४ मध्ये त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, अशी शक्यता चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.