मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकारण तापताना दिसत आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जातेय. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिशय खोचक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
“उद्धव ठाकरेंची तुम्ही भाषा बोलताय, मी नागपूरचा आहे. पण संस्कार आडवे येतात. नागपुरी भाषेत बोलायल गेलं ना हा घरकोंबडा आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही. इतकं वाईट सरकार चालवलं, दोन-दोन मंत्री जेलमध्ये होते. दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलं. त्यांचा राजीनामा तुम्ही घेऊ शकला नाहीत. त्यांची लाळ चाटली”, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
“बावचटलेला, अत्यंत निराश झालेला व्यक्त असतो, जीवनातून सारं चाललं जातं तेव्हा व्यक्ती जसा निराश होतो आणि आत्महत्या करायला निघतो, त्याप्रमाणे या पद्धतीची असंस्कृती वापरुन राजकीय आत्महत्या करण्याकरता उद्धव ठाकरे निघाले आहेत. या पद्धतीने त्यांचं बोलणं राहीलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष त्यांना आडवी पाडेल. त्यांना सोडणार नाही. जिथे उद्धव ठाकरे जातील तिथे भाजप रस्त्यावर उतरेल. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही अपशब्द बोलले तर भाजप रसत्त्यावर उतरेल”, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
“मी राज्याचा अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना सांगतोय. आज तुम्हाला शेवटची संधी दिलीय. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा. धमकी म्हणून समजा. यानंतर तुम्ही आमच्या नेत्याला बोलायचं नाही. तुम्हाला तो अधिकार नाही. ज्या पद्धतीने हे वागत आहेत, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसही यांना सोडेल. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कुणीच मान्य करु शकत नाही. शून्य कर्तृत्वाचं नेतृत्व आहे. आज सारं गेलं तरी सुद्धा सुधरत नाही. मी आणि माझा मुलगा, मी आणि माझा परिवार एवढंच कर्तृत्व शून्य राहीलं आहे”, अशी टीका बावनकुळेंनी केली.
“वाझे सारखे लोकं जेलमध्ये गेले. अशा लोकांची लाळ उद्धव ठाकरे चाखत होते. लहान-लहान अधिकाऱ्यांकडून करप्शन करुन घेतलं. शंभर-शंभर कोटी रुपये अधिकाऱ्यांना मागितले. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री आणि आता गृहमंत्री झाल्यावर काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस काय करतील ही भीती त्यांच्या मनात आहे. आमच्यातला कोण उद्या कुठल्या चौकशीला सामोरं जाईल आणि किती त्याच्याकडून घबाड निघेल, याची भीती वाटतेय. उद्या जर देवेंद्रजींनी विचार केला, खरंतर त्यांचा तसा स्वभाव नाही”, असं बावनकुळे म्हणाले.
“मी देवेंद्रजींना वारंवार विनंती करतो की, स्वभाव बदलवा. देवेंद्रजी स्वभाव बदलवत नाही हा प्रश्न आहे. देवेंद्रजींनी स्वभाव बदलावा आणि काढणं सुरु केलं तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहणं मुश्किल होऊन जाईल. इतकी सामग्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे”, असा इशारा त्यांनी दिला.
“तुम्ही कशाला बोलता? तुमचं काय कर्तृत्व आहे, तुमची काय उंची आहे? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही सर्वच स्तरावर फेल झाला आहात. त्यामुळे जनाची नाहीतर मनाची ठेवा. ज्या देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना तुमचा लाळ पोसला, उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने मानसन्मान दिला, भावापेक्षाही जास्त प्रेम देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलं. एकवेळ भाजपच्या कार्यकर्त्याचं काम बाजूला ठेवलं, पण उद्धव ठाकरेंनी सांगितलेलंल एक-एक काम त्यांनी पूर्ण केलं. पण हा घरकोंबडा देवेंद्रजींना बेईमान बोलतोय. उद्धवजी तुम्ही पाच वर्ष आठवा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय-काय करुन घेतलं. देवेंद्र फडणवीस बोलायला लागले तर घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जाईल. महाराष्ट्र विधानसभेतील 90 टक्के सदस्य देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करतात”, असं बावनकुळे म्हणाले.