मोठी बातमी | छत्रपती संभाजीराजे स्वतंत्र पक्षासह राजकारणात येणार? लवकरच जाहीर घोषणेची शक्यता
आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर संभाजीराजेंच्या नव्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलंय.
पुणेः राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) काही दिवसातच स्वतंत्र पक्ष स्थापन करता राजकारणात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Sanghatana) माध्यमातून राज्यभरात संघटन उभारण्याची सुरुवात संभाजीराजेंनी काही महिन्यांपूर्वी केली. या संघटनेचे अनेक उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये (Gram Panchayat Election) विजयी झाले. विजयी उमेदवारांचा गौरव सोहळा लवकरच संभाजीराजेंच्या हस्ते पार पडणार आहे. याच सोहळ्यात संभाजीराजे मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटलं जातंय…
कोल्हापूरच्या राजकारणात मागील दोन दशकांपासून छत्रपती संभाजीराजे यांचा मोठा दबदबा आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
पुण्यात पुढच्या आठवड्यात स्वराज्य संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेचे 13 सरपंच आणि 89 सदस्य निवडून आले.
त्याच मेळाव्यात संभाजीराजे नव्या सदस्यांचा सत्कार करणार आणि नवी भूमिका करणार जाहीर करणार आहेत. त्यामुळे संभाजीराजेंच्या राजकीय भूमिकेकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
संभाजीराजे यांना भाजपने 2016 मध्ये राष्ट्रपती नियुक्त खासदारकी दिली. त्यानंतर मे 2022 मध्ये पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता.
ठाकरे गटाने पाठिंबा दिला नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली. त्यामुळे संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली.
त्याच वेळी संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. सर्व पक्षांपेक्षा वेगळं अस्तित्व ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठा समाजाचा भक्कम पाठिंबा असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी भाजपा पुरस्कृत राज्यसभा सदस्य असतानाही आपण भाजपाचे नसल्याचा वारंवार प्रयत्न केलाय.
त्यात राज्यसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीने संभाजीराजेंना दूर ठेवल्याचं चित्र दिसलं. शिवसेनेने तर पक्ष प्रवेशाचीच अट घातली होती. त्याच वेळी आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवणारे छत्रपती संभाजीराजे वेगळा पक्ष स्थापन करण्याची अपेक्षा होती.
मात्र केवळ स्वराज्य संघटना स्थापन करून महाराष्ट्रभर संघटन उभे करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली होती. या संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असं त्यावेळीच संभाजीराजेंनी स्पष्ट केलं होतं.
आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर संभाजीराजेंच्या नव्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलंय.