नाशिक: राज्याचे नवे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी आता फोनवरून बोलताना वंदे मातरम म्हणणं सक्तीचं केलं आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. मुनगंटीवार यांच्या या निर्णयाला रझा अकादमीने जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे वंदे मातरमचा वाद गाजण्याची चिन्हे आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे पूर्वी जय महाराष्ट्र म्हणायचे. त्यामुळे आता जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, असा टोला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यानी लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आता थेट सुधीर मुनगंटीवार यांनाच जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे विचारलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. शिवसैनिक जय महाराष्ट्र म्हणतात. पोलीस जय हिंद बोलतात. त्यात कोणी वंदे मातरम म्हटले तर गैर काय? असा सवाल करतानाच कायद्याने आशा गोष्टी होत नाहीत. मी जय महाराष्ट्र नाहीतर जय हिंद बोलेल, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
दरम्यान, भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. देशाचा पोशिंदा असलेला देशातील सर्व शेतकरी वर्ग आज अडचणीत आला आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर मोठ संकट कोसळले असून या शेतकऱ्यांना पुन्हा उभ करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देशाच्या स्वातंत्र्याला आज 75 वर्ष पूर्ण होत असून अनेक वीरांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याची जपवणूक करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय, भगतसिंग, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक क्रांतीकारकांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल यांनी देशाची सूत्र आपल्या हाती घेऊन पंचवार्षिक योजनेची घोषणा केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचे पाऊल पडले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने संशोधन शेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली. अंतराळ क्षेत्रात विविध मोहिमा यशस्वी केल्या. तसेच विविध क्षेत्रात प्रगती साधली. त्यामुळे आपला देश हा विकासाच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर पोहचला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्यासह अनेक नेत्यांचे देशाच्या विकासात अतिशय महत्वाचे योगदान दिले. मात्र काही लोकांकडून हा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे, असंही ते म्हणाले.