Chhagan Bhujbal : तुम्हीच म्हणाला होतात ना, आम्ही सत्तेसाठी आलो नाही, मग आता रडता कशाला?; भुजबळांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना डिवचले
Chhagan Bhujbal : तसेच थोर समाजसेवक ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ केली नसती तर आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळाला असता का..? असा प्रश्नही त्यांनी केला.
नाशिक : खाते वाटपात भाजपकडे जास्त खाती गेल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यातच ज्या मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती मिळाली आहेत. ते अधिकच अस्वस्थ झाले आहेत. शिवसेने विरोधात बंड केल्यानंतर नव्या सरकारमध्ये चांगलं खातं मिळेल असं या मंत्र्यांना वाटत होतं. पण झालं उलटंच. उलट काही मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती मिळाली तर काहींना आहे त्याच खात्यावर समाधान मानावे लागले आहे. शिवाय शिंदे गटापेक्षा भाजपकडे (bjp) अधिक महत्त्वाची आणि मलाईदार खाती गेली आहेत. त्यावरून आता भाजप आणि शिंदे गटाकडूनही सारवासारव सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी खाते वाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या मंत्र्यांना चिमटे काढण्यास सुरुवात केली आहे. तुम्हीच म्हणाला होतात ना, आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता रडता कशाला? असा सवालच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला करून शिंदे गटाच्या मंत्र्यांना (cm eknath shinde) डिवचले आहे.
छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अखेर खाते वाटप झालं आहे हे महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कुणाला सांगायचे हा प्रश्नच होता. अजून खूप मंत्री यायचे आहेत. त्यावेळेस खात्यांचं पुनर्वाटप होईल. जे खातं दिल आहे, त्यात काम करून दाखवलं पाहिजे. भाजपकडे जास्त मंत्री आहेत. मुख्य वाटा जर भाजपकडे गेला असेल तर चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. शिंदे गटातील अनेकांनी सांगितलं आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता कशाला रडता?, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
नेहरुंचं बलिदान कसं विसरू शकतो?
देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय याचा आनंद आहे. तिरंगा आपल्या राष्ट्राचे निशाण आहे. तिरंगा ध्वजाच्या रक्षणासाठी लाखो जवान सीमेवर लढत आहेत. स्वातंत्र्य महोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले असले तरी टिळक, गांधी, नेहरू, बोस, सावरकर यांनी बलिदान दिले. अनेकांनी काळ्या पाण्याची सजा भोगली. पंडित नेहरू 11 वर्ष जेलमध्ये राहिले. प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी लढले. पुस्तकांमध्ये काही ठिकाणी पंडित नेहरूंचे चित्र छपायचे का नाही याबाबत चर्चा सुरू आहे. पण त्यांचं बलिदान कसं विसरू शकतो आपण? फक्त एखाद्याच्या चूका दाखवून नाही चालत. कोणी महिला म्हणाली की, स्वातंत्र्य भीक मागून मिळालं. काही जण म्हणाले स्वातंत्र्य 2014 ला मिळालं, असा चिमटाही त्यांनी काढला.
सोशल मीडियाचा योग्य वापर करा
स्वातंत्र्याचा खूप मोठा अर्थ आहे. संसदीय लोकशाही असलेल्या आपल्या देशात आपण स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून ज्या स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारकांनी व ज्ञात ,अज्ञात अशा अनेकांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान केलेल्या सर्वांची आपण जाणीव ठेवून पुढे वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करावा, इतिहासाचा अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.
तर स्वातंत्र्याचा अर्थ कळला असता का?
पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या विकासाचा पाया रचला. त्यातून देशातील स्पेस, इन्फ्रास्ट्रक्चर ,विज्ञान क्षेत्राचा विकास झाला असल्याचे सांगितले. तसेच थोर समाजसेवक ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ केली नसती तर आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळाला असता का..? असा प्रश्नही त्यांनी केला.