छत्रपती संभाजीनगर | 21 ऑगस्ट 2023: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात कोणता पक्ष कुणाला उमेदवारी देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली. खुद्द संजय राऊत यांनीही पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू, असं म्हटलं. त्यावर आता शिंदे गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत वेडा माणूस आहे, सकाळी भुंकण्यासाठी काहीही मुद्दे घेत असतो. संजय राऊत निवडणूक लढवणार असतील. तर ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण एकदा त्यांना त्यांची औकात कळू द्या…, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत. तसंच संजय राउतचे डिपॉझिट जाऊ नये म्हणजे झालं, अशी टिपण्णीही संजय शिरसाट यांनी केली आहे.
ठाण्यातील रूग्णालयात एकाच दिवशी 18 लोकांचा मृत्यू झाला. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्याची माहिती आहे. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला असेल तर यात काहीही गैर नाही. या मुद्द्याला विनाकारण वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार यांनी या प्रश्नातले गांभीर्य दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी जो मुद्दा काढला तो चांगला आहे. त्याबद्दल वाईट वाटण्यासारखं काही नाही, असं ते म्हणाले आहेत.
राज्यामधील जनतेने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही, असं वक्तव्य सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. त्यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य योग्य आहे. राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधीही झाला नाही. जेव्हा होण्याची वेळ आली. तेव्हा ते दुसऱ्या पक्षाला दिलं, शरद पवार यांची महाराष्ट्रात ताकत असली तरी सत्ता हाती आली नाही. हेही तितकंच सत्य आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खुली ऑफर दिली आहे. तुम्ही कशाला घाबरता तुम्ही इंडियामध्ये या तुम्हाला पंतप्रधान करू. हा शब्द तुम्हाला उद्धव ठाकरे सुद्धा देतील, असं म्हणत विनायक राऊत यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली. त्यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. विनायक राऊत कसंही स्टेटमेंट करतात. आपली लायकी आणि पोच पहिली पाहिजे, माणसाने लायकी पाहून वक्तव्य करावं, असं संजय शिरसाट म्हणालेत.