उद्धव ठाकरे आणि शिंदेगटाच्या आमदारांमध्ये भेट?; शिवसेनेच्या आमदाराचं मोठं वक्तव्य
Sanjay Shirsat on Uddhav Thackeray Shivsena MLA Meeting : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट?; शिवसेनेच्या नेत्यांनं उघडपणे सांगितलं... संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काय म्हणालेत? पाहा...
छत्रपती संभाजीनगर | 16 ऑगस्ट 2023 : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारमधून बाहेर पडले. आपल्या समर्थक आमदारांसोबत ते भाजपसोबत गेले. सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे शिवसेनेत दोन गट पडले. अशात दोन्ही गटांकडून विरोधी गटातील आमदार-नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत होता. आता उद्धव ठाकरे आणि शिंदेगटाचे आमदार यांच्यात भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी या सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाचे आमदार भेटले का? याबाबत तुमच्याकडे काय माहिती आहे?, असं विचारलं असता संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं. आमचे आमदार भेटले नाहीत. तर याउलट त्यांच्याच आमदारांचा प्रयत्न चालू असतो. ते म्हणतात की,आमचं इथं कसं होणार? आम्हाला तुमच्यात सामावून घ्या. ठाकरे गटाचे अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत. त्यांचं काय ऑपरेशन होणार आहे आता तुम्हाला लवकरच कळेल. ठाकरे गट द्विधा मनस्थितीत आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.
शरद पवार आणि अजित पवार भेटले. त्यामुळे यांचा बीपी हाय झाला आहे. महाविकास आघाडी ही मुळात टिकणार नाही. ठाकरे गट आणि काँग्रेस यांची कुठेही वैचारिक बैठक जुळत नाही. त्यामुळे हे गॅसवर आणि सलाईनवर आहे. त्यांना कळत नाही कुठे जायचं ते. हे शरद पवारांना काय दूर करतील, शरद पवारांनी यांना बाजूला केलं आहे, असं संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांचं राजकीय आरोग्य बिघडलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना काढला आहे. 24 तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाला हे यांचं खरं दुखणं आहे. पहिला मुख्यमंत्री कोणाला भेटत नव्हता काम करत नव्हता. त्यामुळे यांच्या डोक्यात आलेल्या भन्नाट कल्पनाही मांडत असतात, असंही शिरसाट म्हणाले.
विरोधी पक्षासारख्या नेत्याला असे बोलणे शोभत नाही. त्यानी अशी सूत्राच्या आधारे माहिती देणं चुकीचं आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते. त्याची हेडलाईन बनते असा त्यांचा गैरसमज आहे. वडेट्टीवारांना अशा गोष्टी सांगतंच कोण? ते काय मोदी साहेबांसोबत नाश्ता करायला बसले होते का? टेबल न्यूज प्रमाणेच ही बातमी आहे बाकीच्या तथ्य नाही. आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न वडेट्टीवार करत आहेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.