मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर नाव न घेता टीका केली (Chhatrapati Sambhaji Raje reply to Vijay Wadettiwar). “मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करु नये”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. त्याचबरोबर “शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांचे हे वर्तन शोभणारे नाही”, अशी टीका संभाजीराजे यांनी केली आहे (Chhatrapati Sambhaji Raje reply to Vijay Wadettiwar).
मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर विजय वडेट्टीवार यांनी “मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे”, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवर नाव न घेता टीका केली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करु नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या सारथी संस्थेला आणि त्याआडून मराठा समाजाला अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही”, असा घणाघात संभाजीराजेंनी केला आहे.
विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. “सारथी संस्था बंद पडणार नाही हे मी आजही छातीठोकपणे सांगतो. पण यामागे राजकीय मंडळी या मंडळींना चिथावणी देत आहेत, त्यांची नावं योग्यवेळी जाहीर करेन”, असं यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.
“मी सारथीसाठी प्रामाणिक काम करतोय. मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे”, असं वडेट्टीवार म्हणाले होते.
हेही वाचा : ‘सारथी’चा पंख छाटण्याचा प्रयत्न, सरकारने दुटप्पी भूमिका सोडावी, संभाजीराजे आक्रमक
“मी प्रामाणिकपणे काम करतोय. पण तरीही तुमचे आरोप झाल्यानंतर मला त्यामध्ये काम करण्यात रस नाही. आमच्या सरकारला केवळ ६ महिने झाले आहेत. मात्र चार महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनामध्ये गेले. सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती बिकट आहे. निधीचा तुटवडा आहे. पण हा निधी मागे-पुढे होईल, मात्र सारथी बंद पाडणार नाही. सारथीसाठी थोडासा वेळ लागणार आहे. सर्व बंद असताना केवळ एकच सारथीची भूमिका लावून धरणं योग्य नाही”, असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं.
मराठा मोर्चाकडून वडेट्टीवारांच्या राजीनाम्याची मागणी
मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.