संजय राऊतांनी कोणत्या भूमिकेतून अग्रलेख लिहिला? संपादक की खासदार?; अंबादास दानवे म्हणाले…
Ambadas Danve on Saamana Editorial : सामनाचा अग्रलेख, शरद पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य अन् संजय राऊत यांची भूमिका; अंबादास दानवे यांची सविस्तर प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगर : शरद पवार यांनी 2 मेला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि 5 मेला राजीनामा मागे घेत असल्याचं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावर काल सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. या अग्रलेखावरून राजकारण तापलं आहे. पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!, या शीर्षकाखाली कालचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. तसंच ते सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. पण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कालचा आग्रलेख हा संजय राऊत यांनी सामनामधून पत्रकार म्हणून लिहिलेला आहे. सामनात लिहिलं गेलं की, त्याची इतकी चर्चा होते, हे सामनाचं यश आहे, असंही अंबादास दानवे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी संजय राऊत यांनी लिहिलं आहे. राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते आहेत. पण पक्ष चालवणं आणि मंत्रिपद चालवणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एकवेळ मंत्रिपद चालवणं सोपं आहे. मात्र पक्ष चालवणं सोपं नाही, असंही दानवे म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया
सत्ता संघर्षाच्या निकालासाठी मंत्रिमंडळ विस्तार थांबलेला नाही, असं म्हणता मग जर सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करायचा असेल तर त्यांनी तो करून दाखवावा, असं चॅलेंजही त्यांनी शिंदे-फडणवीस यांना दिलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मंत्रिपदं कोणाला द्यायची? पन्नास लोक गेले होते. पन्नास जणांना मंत्री व्हायचं होतं. मंत्रिमंडळाचा विस्तार हा सरकारमधील अंतर्गत स्पर्धेमुळे थांबलेला आहे, असा घणाघातही दावने यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समावेश होईल. आमचे नेते उद्धव ठाकरे या संदर्भातील बोलून अंतिम निर्णय घेतील, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय.
बारसू रिफायनरी प्रकल्पावर प्रतिक्रिया
बारसूत होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यावर बोलताना, बारसूमधील कातळ शिल्प हे जागतिक वारसा आहेत. त्या ठिकाणी रिफायनरी करता येऊ शकत नाही हा सगळा विषय जागतिक वारसा स्थळांकडे जाईल. त्यामुळे या ठिकाणी आता रिफायनरी तिथं होणं शक्य नाही, असं अंबादास दानवे म्हणालेत.