छत्रपती संभाजीनगर | 04 सप्टेंबर 2023 : 2019 ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची ठरली. या निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. निवडणुकीआधी आणि निवडणूक काळात अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं. 2019 च्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यात एक मोठं नाव होतं ते म्हणजे पंकजा गोपीनाथ मुंडे… गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांचा पराभव मुंडे समर्थकांच्या जिव्हारी लागला. याच पराभवावर पंकजा मुंडे आज बोलत्या झाल्यात. पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.
बापाच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि एका क्षणात मी राजकारणात आले. मुंडेसाहेब एकटे पडले, असं वाटल्यावर मी माय झाले. मी भ्रष्टाचार मुक्त कारभार केला. तरी माझ्यावर आरोप झाले. आज सकाळी कुणी कुठे, दुपारी कुणी कुठे… या सगळ्यान डोकं फिरलं, म्हणून मी दोन महिने सुट्टी घेतली. मला सल्ले देणारे अनेक आहेत. 2019 ला तिसरा उमेदवार असता, तर परळीत माझा पराभव अशक्य होता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
आता संघर्षकन्या नाव बदलायचा ठरलं आहे. कारण सगळे सिरीयसली घेत आहेत. यापुढे आपल्या वाट्याला संघर्ष नाही, आला पाहिजे. माझ्या उरात शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करेल. राजकारणात काट्यावर चालणाऱ्या व्यक्तीला संघर्ष आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीवर भाष्य केलं आहे. आमच्याकडे मिशनही नाही आणि कमिशनही नाही. माझ्याकडे बदल्या करायला आहे का काही? यालाच म्हणतात प्रेम… मी आता राजकीय भाषण केलेलं नाही. राजकीय भाषण विधानसभा निवडणुकीपूर्वी करू, असंही त्या म्हणाल्या.
शिव आणि शक्ती जशी भिन्न करता येत नाही. तसं मुंडे आणि तुम्हा लोकांना वेगळं करता येत नाही. गेली साडे चार वर्ष मला सगळे म्हणत आहेत, इकडे या आमच्या पक्षात या… पण आईला संयम दाखवावा लागतो. तुमच्या प्रेमाच्या सावलीपेक्षा मोठी सावली मला नाही मिळू शकत नाही. मला ईश्वराचं दर्शन करायचं आणि या माध्यमातून तुमचं दर्शन होणार आहे. जेवढे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ आहे. त्याचं दर्शन करणार आहे. याला थेट यात्रेचं स्वरूप आलं आहे. माझ्यावर एवढे फुले वाहिली की, मला काही कळतच नाही. मला प्रश्न विचारला की, महादेवाकडे काय मागितलं? मी मागितलं की, कोणतीही वेळ असो, कोणतेही ठिकाण असो, लोकांचे प्रेम कमी होऊ देऊ नको, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरु झाला आहे. शिवशक्ती परिक्रमा दौऱ्याचा आज पहिला दिवस आहे. पंकजा मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील वेरीळच्या घृष्णेश्वर मंदिरात जात महादेवाचं दर्शन घेतलं. शिवशक्ती परिक्रमा दौऱ्या दरम्यान पंकजा मुंडे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे.