छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि… नोटांवर आणखी कोण कोण?
इंडोनेशियाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे. मग आपल्या देशात का नाही ?
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी, नोटांवर लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचा फोटो लावण्याची मागणी केली. त्यानंतर, भाजप, काँग्रेस, ठाकरे गट, रिपाईंखरात गटाकडून वेगवेगळ्या मागण्या झाल्या आहेत. केजरीवालांनीच आधी सुरुवात केली, केजरीवालांचं म्हणणंय की, महात्मा गांधीसह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो असावा भाजपचे आमदार नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्याची मागणी करत, तसा फोटोच त्यांनी ट्विट केला आहे. भाजपचे आमदार राम कदमांनी तर मोदींचाही फोटो छापा असं म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि सावकरांसह पंतप्रधान मोदींचा फोटो लावा असं राम कदमांचं म्हणण आहे.
काँग्रेसचे मनिष तिवारी आणि नितीन राऊतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची मागणी केली. रिपाईं खरात गटाचे सचिन खरातांनी नोटांवर भगवान गौतम बुद्धांचा फोटो लावण्याची मागणी केली.
ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांना वाटतंय की, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापायला हवा ठाकरे गटाचेच अनिल परबांनी तर नोटांवर बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोची मागणी केली.
इंडोनेशियाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे. मग आपल्या देशात का नाही ? असा सवाल केजरीवालांचा आहे. सर्वात आधी 1969 मध्ये महात्मा गांधींचा फोटो नोटांवर छापण्यात आला.
तेव्हापासून आतापर्यंत नोटांवर महात्मा गांधी आहेत. पण, आता अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावा, अशी विनंती केजरीवालांनी मोदींना केली. त्यानंतर ही मागणी, भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर आणि पंतप्रधान मोदींच्या फोटोंपर्यत आली.
आता खरा प्रश्न हा आहे, की महात्मा गांधींच्या फोटोसह किंवा त्यांच्या फोटोऐवजी दुसरे महापुरुष किंवा देवतांचा फोटो लावता येतो का?तर त्याचं उत्तर 2014 मध्ये दिवंगत तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेत दिले.
भारतीय रिझर्व बँकेनं एका समितीची स्थापित केली होती. आणि आरबीआयच्या समितीनं महात्मा गांधींशिवाय इतर कोणताही दुसरा फोटो न छापण्याचा निर्णय घेतला आहे.
नोटांवर फोटो लावण्यावरुन राजकारण जोरात सुरु झालंय..पणो एक बाब स्पष्ट आहे की, नोटांवर कोणता फोटो असावा, याचा निर्णय केंद्र सरकार नाही तर रिझर्व बँकच घेणार आणि सध्या तरी रिझर्व बँक नोटांवर इतर कोणतेही फोटो लावण्याच्या मनस्थितीत नाही.