सगळ्यांचे स्वतंत्र फॉर्म्युले, छुपे अजेंडे, मविआ फार काळ टिकणार नाही; भाजपच्या मंत्र्याचं टीकास्त्र
Radhakrishna Vikhe Patil on Mahavikas Aghadi : ज्यांना स्वतः चा पक्ष सांभाळता आला नाही ते काय जागा वाटप करणार? भाजपच्या मंत्र्याचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील झोलेगाव इथं मराठवाड्यातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्घाटन आज पार पडलं. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे मोफत पास देण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार टीका केली आहे.
ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ते काय जागा वाटप करणार? मविआमध्ये सगळ्यांचे स्वतंत्र फॉर्म्युले आहेत आणि सगळ्याचे छुपे अजेंडे आहेत. त्यामुळे ही आघाडी फार काही टिकणार नाही, असं विखे पाटील म्हणालेत.
जागा वाटपबद्दल आमच्यात काही वाद नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे ठरवतील. जागा वाटपाचा प्रश्न महाविका आघडीत आहे. रोजच वज्रमूठ तयार होते आणि तिला तडे जात आहेत. हे फारकाळ टिकणार नाही, असं विखे पाटलांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांचे सरकार आल्याने निर्णय झपाट्याने होत आहेत. मागच्या सरकारमधील मुख्यमंत्री फेसबुकवर बोलायचे, असा टोला विखे पाटलांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
रमेश बोरणारे महाराष्ट्रमधील कर्तव्यदक्ष आमदार आहेत, असं म्हणत विखे पाटील यांनी रमेश बोरणारे यांची स्तुती केली आहे.
वाळूच्या बाबतीत आमचेच तहसीलदार हफ्ते घेतात, याची आम्हाला लाज वाटते. अहमदनगरमध्ये तहसीलदार वाळूचा हफ्ता घेताना पकडला गेला. अधिकारी आणि वाळू ठेकेदार शासकीय वाळू डेपोसाठी अडथळे आणतायेत. पण सरकार ठाम आहे. थोडा वेळ लागेल. जे आडवे येतील त्यांना आम्ही सरळ करू, असा इशाराच त्यांनी वाळूमाफियांना दिलाय.
वाळू मुळे माफिया, गुंडांच्या टोळ्या गावागावात निर्माण झाल्या आहेत. वाळू डेपो सुरू होऊ नये, म्हणून आमचे अधिकारी आणि वाळू माफिया सक्रिय आहेत. पण पण वाळू डेपो सुरू होणार आहेत. जे आडवे येत आहेत त्यांच्या याद्या काढण्याचे आदेश दिले आहेत, असंही ते म्हणालेत.