अरे बापरे, देवेंद्र फडणवीस यांच्या विक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला शह, ‘या’ बाबतीत केला नवा विक्रम
राज्यात 2013 - 14 मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना जो खर्च करण्यात आला त्याच्या तुलनेत त्यानंतरच्या फडणवीस सरकारने दुप्पट खर्च करून नवा विक्रम केला होता. पण, मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर अवघ्या सात महिन्यात कुरघोडी केली आहे.
मुंबई : राज्यसरकार आपल्या विविध विकासकामांची जाहिरात प्रसिद्ध करत असते. वतर्मानपत्र, रेडिओ, टीव्ही, फ्लेक्स, बॅनर्स यावर होणार खर्च अफाट असला तरी तो आटोक्यात असावा लागतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जाहिरातीवर वारेमाप खर्च केला. त्याबद्दल त्यांच्यावर चोहोबाजूने टीका झाली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. 2013-14 मध्ये कॉंग्रेसच्या काळात रेडिओसाठी 59 लाख 96,281 रुपये तर फडणवीस यांच्या काळात 2015-16 मध्ये 84 लाख 84,989 रुपये खर्च करण्यात आला होता. पण, केवळ आठ महिन्याच्या काळातच मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागे टाकत जाहिरातीवर खर्च करण्यास मागेपुढे पाहिले नाही. बारामतीचे नितीन संजय जाधव यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या जाहिरातीची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
2013 -14 मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने रेडिओला 59 लाख 96,281 रुपयांच्या जाहिराती दिल्या. त्यांनतर फडणवीस यांचे सरकार आले. फडणवीस यांनी 2015 -16 या एका वर्षात 84 लाख 84,989 रुपये रेडिओला जाहिरातीसाठी दिले. फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या काळात जाहिरातीवर 15 कोटीहुन अधिक खर्च केला होता. यावरून फडणवीस यांच्यावर मोठी टीका झाली होती. दिवसाला साधारण 85 हजार इतका हा खर्च होता असे मानण्यात येते. दवेंद्र फडणवीस सरकारचा हा विक्रम आहे अशी टीका विरोधकांनी केली होती. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंद हे देवेंद्र फडणवीस यांच्या एक नव्हे तर अनेक पाऊले पुढे गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून किती खर्च केला याची माहिती नितीन जाधव यांनी मागितली. 1 जानेवारी 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून ते आजपर्यत जाहिरातीवर किती खर्च केला याची महिन्यानुसार माहिती मिळावी असा अर्ज जाधव यांनी संचालक, माहिती आणि वृत्त व जनसंपर्क तथा अपिलीय अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यांना दिनांक 25 जानेवारी रोजी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पत्र पाठवून माहिती दिली आहे. नितीन जाधव यांना देण्यात आलेल्या उत्तरामधून विविध कार्यक्रमांच्या जाहिरातीसाठी 42 कोटीहून अधिक खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे.
कोणत्या कार्यक्रमासाठी किती खर्च तारखेसह
9, 11 आणि 13 ऑगस्ट 2022 – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम – 10 कोटी 61 लाख 568 रुपये खर्च
8, 10 आणि 11 डिसेंबर 2022 – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ – 11 कोटी 50 लाख
3 नोव्हेंबर 2022 – राज्यस्तरीय रोजगार मेळावा – 7 कोटी 57 लाख 45 हजार
17 सप्टेंबर 2022 – राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा – 4 कोटी 72 लाख 58 हजार 948
3 जानेवारी 2023 – इंडियन सायन्स काँग्रेस – 2 कोटी 37 लाख
4 जानेवारी 2023 – मराठी भाषा मराठी तितुका मेळवावा – 1 कोटी 76 लाख 9 हजार 192
19 जानेवारी 2023 – एमएमआरडीए – 1 कोटी 13 लाख 47 हजार 200
23 जानेवारी 2023 – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती – 96 लाख 40 हजार 680
18, 23, 30 ऑगस्ट 2022 आणि 7, 13, 23 सप्टेंबर – केंद्र शासनाचा उपक्रम असलेला बुस्टर डोस – 86 लाख 70 हजार 344
4 जानेवारी 2023 – जी. 20 – 85 लाख 16 हजार 592
16 डिसेंबर 2022 – उद्योग (रत्नांचा सागर) – 8 लाख 74 हजार 944