कोल्हापूर | 17 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं अधिवेशन कोल्हापुरात पार पडलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी समारोपाचं भाषण केलं. या समारोपाच्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांची कार्यशैली, मातोश्री भोवती झालेली चांडाळ चौकडी आणि मातोश्रीतून होणारा त्रास, अवहेलना आणि अपमान यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत उद्धव ठाकरे यांना आरसाच दाखवला. तसेच रामदास कदम यांचा मनोहर जोशी करण्याचा डाव उद्धव ठाकरे यांचा होता, असा गौप्यस्फोटही एकनाथ शिंदे यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे कोल्हापूरात महाअधिवेशन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अधिवेशनात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. आमच्या सोबत 50 आमदार आणि 13 खासदार आणि बरेचसे शिवसैनिक आले आहेत. जो गेला की लगेच त्यास गद्दार ठरविता. हेच कार्यकर्ते तुम्हाला कचऱ्यात घालतील आणि ‘हम दो हमारे दो’ अशी परिस्थिती तुमच्यावर येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले. धनुष्यबाण निशाणी आम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही पक्ष निधीचे 50 कोटी लगेच मागून घेतले. आम्हाला पैसा नको बाळासाहेबांचे विचार हवेत म्हणून आम्ही लगेच पैसे देऊन टाकले. 50 कोटी मागताना जनाची नाही तर मनाची लाज पाहीजे होती. तुमच्यावर आलेली संकटे मी छातीवर घेतली आहेत. आपल्याजवळ बोलण्या सारख्या खूप गोष्टी आहेत. वेळ येईल त्यावेळी मी बोलेल असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि मोदी साहेबांना दोन वेळा फसवलं आहे, मग तुम्ही आमच्यावर का आरोप करता. तुम्ही आम्हाला बेईमान म्हणता शिव्या शाप देता, परंतू आम्ही शिवसेनेला वाचविले, जेवढा तुम्ही आमच्यासाठी खड्डा खणणार तेवढे तुम्ही त्या खड्ड्यात जाणार अशी टीका त्यांनी यावेळी ठाकरेंवर केली. चेहऱ्यावर अनेक मुखवटे घालून फिरणाऱ्यांनी चेहरा आरशात पहावा. या गोष्टी लपत नाहीत सर्व बाहेर पडत असतात. बाळासाहेबांचा वारसा तोंडात नाही मनगटात जोर आणि ताकद असावी लागते असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी समोर बसलेल्या शिशिर शिंदे यांचा उल्लेख करीत पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं आणि जेलमध्ये गेले. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही रक्ताचे पाणी केलं. मनोहर जोशी यांना भर व्यासपीठावरून उतरविण्याचे काम तुम्ही केले. त्याचं घर जाळण्याचे आदेश दिले. रामदास कदम यांचा मनोहर पंत करण्याचा तुमचा इरादा होता. नारायण राणे राज ठाकरे असतील त्यांनी असे काय मागितले होते, ज्याचा तुम्हाला त्रास होता. मातोश्रीत कानामध्ये सांगणारे जे होते त्यामुळे कार्यकर्ते गेल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.
एखादा शिवसेनेचा कार्यकर्ता भाषण करायाला लागला तर त्याचे भाषण कट करायला तुम्ही सांगत होता. एखादा कार्यकर्ता भाषण करा लागला तर त्याचे भाषण कट करायला तुम्ही सांगत होता. पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्याच्या पाठीशी राहिला पाहिजे तरच पक्ष मोठा होतो असा पक्ष मोठा होत नाही. दोन-चार टाकल्याने पक्ष वाढत नाही. असे तीन-चार एकनाथ शिंदे भागा भागामध्ये तयार केले पाहिजेत असेही ते म्हणाले. आपण पाच वेळा सांगितलं की युती करा, परंतू त्यांना पाच वर्षे मुख्यमंत्री पदाचा स्वार्थ होता. झाडावर बसूनच फांदी तोडणाऱ्या मुंगेरी लालचं स्वप्नं तुम्हाला पाहायचं होतं. पुत्र प्रेमामुळे महाराष्ट्राला तुम्ही मागे पाडले असा आरोपही ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी केला.
नक्षलवाद मोठं का सरकार मोठं ? गडचिरोलीमध्ये जाऊन मी कारखाना सुरू केला. 20 हजाराची गुंतवणूक आता करतोय. प्रत्येकाला नोकरी मिळेल असे काम आपण करतोय, अनेक उद्योजक आमच्या मागे लागले आहेत. मागे मला गडचिरोलीत धमकी आली मी कुणाला घाबरलो नाही माझा बाल बाका झाला नाही. मला झेड प्लस सुरक्षा दिली नाही, मी निधड्या छातीचा एकनाथ शिंदे आहे. काय तुमच्या मनात होतं नक्षल्यानी हत्या करावी अशी शंका उपस्थित होत आहे, कारण मी तुमची अडचण होतो असा सनसनाटी आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.