CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाच्या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द, नावावरून स्वयंसेवी संस्थांचा आक्षेप
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज प्रथमच पुणे दौऱ्यावर येत आहेत. शहरातील विविध विकासकामांचा आढावा ते घेणार आहेत.
पुणेः पुण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांच्या नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. विविध स्वयंसेवी संघटनांनी उद्यानाच्या (Pune Garden) या नावाला आक्षेप घेतला होता. आज मुख्यमंत्री शिंदे या उद्घाटन कार्यक्रमासाठी हजेरी लावणार होते. मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आलं आहे. शिवसेनेचे शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संघटनांच्या आक्षेपानंतर अखेर हा उद्घाटन कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे. तसेच उद्यानाच्या नावाचा बोर्डदेखील झाकण्यात आला आहे.
काय आहे नेमका आक्षेप?
हपडसर परिसरातील ही उद्यानाची जागा महापालिकेची आहे. मात्र उद्यान उभारणी आणि विकासासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती असही त्यांचं म्हणणं आहे. असं असलं तरी या नामःकरणाला प्रशासकीय मान्यता नाहीये. परिणामी आजचा उद्घाटन सोहळा वादात सापडला होता. महत्वाचं म्हणजे याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या कार्यक्रमाबाबतही प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्या महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. महापालिकेच्या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित होणे अपेक्षित आहे. मात्र माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वतः च दोन्ही कार्यक्रमांचा आयोजन केलं आहे. त्यामुळे त्यावर टीका होत आहे.
मुख्यमंत्र्यांचा आज पुणे दौरा
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज प्रथमच पुणे दौऱ्यावर येत आहेत. शहरातील विविध विकासकामांचा आढावा ते घेणार आहेत. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार असून यात पाऊस, अतिवृष्टी, पिकपाण्याच्या आढाव्या बरोबरच शहर आणि जिल्ह्यातील विकासकामांच्या प्रगतीचा आलेख मांडला जाईल. या बैठकीनंतर ते सासवड, जेजुरी, पुरंदर आणि हडपसर-धनकवडी अशा विविध ठिकाणी भेटी देणार असून विकास कामांचं लोकार्पण ते करणार आहेत.
आदित्य ठाकरेही पुण्यात
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील मंगळवारी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात येत आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. एकूणच शिंदे गट आणि शिवसेना या दोघांकडून शहरात शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.