मंत्रिमंडळ विस्तारात 4 खाती महिलांकडे? चित्रा वाघ काय म्हणाल्या?
आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. मात्र सध्या तरी तो पुढे ढकलण्यात आला आहे.
पुणेः आगामी मंत्रिमंडळ विस्ताराचे (Cabinet Expanssion) वेध अवघ्या राज्याला लागले आहेत. त्यातच भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्राच्या (Maharashtra) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तीन ते चार खाती महिला आमदारांकडे दिली जातील, अशी मला अपेक्षा आहे. तशी खात्रीदेखील आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच शक्य झालं तर महिला व बालकल्याण खातं एकदा पुरुषांकडे देऊन पहा, असा सल्लाही चित्रा वाघ यांनी दिला आहे.
येणाऱ्या दिवसात मंत्रिमंडळात एक नाही तर तीन चार महिलांना स्थान द्यावं, अशी माझी मागणी आहे. सध्या विधानसभेत सगळ्यात जास्त भाजपाच्या आमदार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकांतही भाजपने आपल्या कोट्यातून महिलेला संधी दिली, त्यामुळे महिला आमादारांना भविष्यात नक्की संधी दिली जाईल, अशी अपेक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
भाजप हा महिलांना प्राधान्य देणाराच पक्ष आहे हे सांगताना चित्रा वाघ यांनी आणखी एक मागणी केली. एखाद्या महिला आमदाराला मंत्रीपद द्यायचं असेल तर तिला डोळे झाकून महिला व बालविकास मंत्रालय देऊन टाकतात. मला असं वाटतं की कधीतरी पुरुषांनी पण हे खातं बघावं.. आम्हाला किती अडचणी येतात ते पहावं. आता प्रकाश लोढा यांच्याकडे ते तात्पुरतं देण्यात आलंय. त्यामुळे त्यांना त्याची कल्पना येईल. सगळ्या आमदार अनुभवी महिला आहेत. पक्षाकडे एकापेक्षा एक सगळ्याजणी महिला आमदार आहेत. येणाऱ्या दिवसात कॅबिनेट विस्तारात त्या दिसतील, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनीही टीका केली. प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मावरून अनावधानाने वक्तव्य केलं. मात्र त्यांच्यावर ज्या प्रकारे टोळधाड पडली. आता संजय राऊत यांच्यावरही तशी टीका होतेय… प्रसाद लाड यांनी माफी तरी मागितली, मात्र संजय राऊत तेदेखील करायला तयार नाहीत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार होता. मात्र सध्या तरी तो पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या 19 डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उर्वरीत खाती तात्पुरत्या काळासाठी इतर मंत्र्यांना वाटप केली आहेत. जेणेकरून अधिवेशनात काही अडचणी येणार नाहीत. जानेवारीत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची महत्त्वाची सुनावणी आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.