नवी दिल्ली: गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा (gujarat assembly elections) कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी गुजरातवर स्वारी करण्यासाठी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीनेही (Aam Admi Party) गुजरातमध्ये करिश्मा घडवून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी गुजरातमध्ये रॅलीही काढल्या आहेत. आता केजरीवाल यांनी एक मोठं विधान केलं आहे. नोटांवर गांधींजींच्या फोटोसह लक्ष्मी आणि विघ्नहर्त्या गणेशाचा फोटोही असावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केलं आहे. केजरीवाल यांच्या या विधानाचा संबंध थेट गुजरात निवडणुकीशी लावला जात असून केजरीवाल गुजरातमध्ये हिंदुत्वाचं कार्ड खेळणार असल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी विनंती आहे की, त्यांनी भारतीय चलनावर एका बाजूने महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी तसेच गणेशाची प्रतिमा छापावी. सर्वच नोटा बदलाव्यात असं आम्ही म्हणत नाही. पण ज्या नोटा छापल्या जाणार आहेत, त्यावर लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा असावी, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
इंडोनेशिया हा एक मुस्लिम देश आहे. तिथे 85 टक्के मुस्लिम आहेत. तर दोन टक्के हिंदू आहेत. तरीही त्यांनी त्यांच्या नोटांवर गणेशाचा फोटो छापला आहे. प्रत्येक कुटुंब श्रीमंत व्हावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. चांगल्या शाळा, रुग्णालये आणि मूलभूत सुविधा दिल्या पाहिजे. देवदेवतांचा आशीर्वाद असेल तेव्हाच हे प्रत्यक्षात उतरेल, असंही त्यांनी सांगितलं.
परवा दिवाळीच्या वेळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करताना हा विचार मनात आला. लक्ष्मी आणि गणेशाचा फोटो छापल्याने अर्थव्यवस्था सुधारेल असं मी म्हणत नाही. पण देवांचे आशीर्वाद मिळतील. आम्ही नोटांवरून काही हटवावं असं म्हणत नाहीये. फक्त इंडोनेशिया करतं तर आपण का करू शकत नाही, इतकंच आमचं म्हणणं आहे. लक्ष्मी ही समृद्धी आणि संपन्नतेची देवी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दिल्लीत यंदा दिवाळी प्रदूषण वाढलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीच्या लोकांनी यावेळी प्रदूषणावर भरपूर काम केलं. त्यामुळे यंदा तुलनेने प्रदूषण कमी झालं आहे. दिवाळी असूनही फरक दिसतो आहे. आम्हीही प्रदूषण कमी झाल्याने समाधानी आहोत. अजूनही बरंच काही करण्याची गरज आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.