दुसऱ्यांच्या लग्नात नाचतंय खुळं, मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर घणाघाती टीका
नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मनसे आता उनसे अर्थात उमेदवार नसलेली सेना झाली आहे. त्यांचं असं झालंय “बघा बघा, रताळाला म्हणतंय केळं आणि दुसऱ्याच्याच लग्नात नाचतंय खुळं”, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर केली. नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी जाहीर […]
नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मनसे आता उनसे अर्थात उमेदवार नसलेली सेना झाली आहे. त्यांचं असं झालंय “बघा बघा, रताळाला म्हणतंय केळं आणि दुसऱ्याच्याच लग्नात नाचतंय खुळं”, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर केली.
नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर तुफान हल्ला चढवला.
मी जनतेना बसवलेला मुख्यमंत्री
“राज ठाकरे म्हणतात मी बसवलेला मुख्यमंत्री आहे. हो मी बसवलेला मुख्यमंत्री आहे. मला जनतेने मुख्यमंत्रीपदी बसवलं, मला मोदीजींनी मुख्यमंत्रीपदी बसवलं. पण तुम्हाला जनतेने घरी बसवलं”, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.
‘राज ठाकरे अभ्यास करुन बोला’
राज ठाकरेंनी अभ्यास करुन बोलावं. ते म्हणतात महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातला जाणार आहे. मात्र हा करार 2010 साली अशोक चव्हाणांनी केला होता. गुजरातला पाणी देण्याचा करार त्यांच्या काळात झाला. पण या पठ्ठ्याने, देवेंद्र फडणवीसने तो करार रद्द केला. महाराष्ट्राचं पाणी, मराठवाड्याचं पाणी मराठवाड्यालाच मिळणार, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
अशोक चव्हाणांर टीकास्त्र
अशोकरावांनी नेता पण किरायाने अर्थात भाड्याने आणला, किरायाच्या भरवशावर निवडणुका जिंकता येत नाहीत. कधी राज ठाकरेंना बेडूक म्हणणारे अशोक चव्हाण आता स्वत:च्या प्रचारासाठी त्यांनाच बोलवत आहेत, असं टीकास्त्र मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाणांवर सोडलं.
राहुल गांधींवर हल्ला
यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढवला. “राहुल गांधी गरिबी हटवण्याच्या नुसत्या घोषणा देतात. गरिबी हटली नाही तर त्यांच्या काळात आणखी वाढली. त्यांच्या पणजोबा, आजोबा, आजी, आईने गरिबी हटवण्याची घोषणा केली. पण गरिबी हटली नाही,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असं काँग्रेसचं धोरण आहे. काँग्रेसच्या काळात दिल्लीतून येणारा पैसा जनतेपर्यंत पोहोचतच नव्हता, मोदी सरकारने थेट लोकांच्या खात्यात पैसे भरुन बाबूगिरी बंद केली, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
राज ठाकरे नांदेडच्या सभेत काय म्हणाले होते? राज ठाकरे यांनी काल नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.
बसवलेला मुख्यमंत्री कधीच काही बोलू शकत नाही, स्वतःच्या हिंमतीवर बसलेला मुख्यमंत्री बोलू शकतो, आज आपल्या महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवलं जातंय, पण देवेंद्र फडणवीस त्यावर काहीच बोलू शकत नाहीत, असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.
“देवेंद्र फडणवीस हा बसवलेला मुख्यमंत्री आहे, त्यामुळे ते काहीही निर्णय घेऊ शकत नाहीत. महाराष्ट्राच्या वाट्याचं गोदावरीचं पाणी गुजरातला जाणार आहे. त्यासाठी काम सुरु झालं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस काहीच बोलू शकत नाहीत” असा दावा राज ठाकरे यांनी केला होता.
संबंधित बातम्या
देशात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली जाईल सांगितलं होतं, ते आज होतंय : राज ठाकरे