सून, भाई, चाचा, आ भतीजा, या नितीमुळेच राष्ट्रवादीची ही अवस्था : मुख्यमंत्री
आघाडीच्या 15 वर्षात झाली नाहीत एवढी कामं आमच्या पाच वर्षात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Baramati) यांनी केला. बारामतीत महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री बोलत होते.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही दिवसात गळती लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज छत्रपती उदयनराजे भोसले हेही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आले. आता पुणे जिल्ह्यात कोणीही राष्ट्रवादीत राहायला तयार नाही अशी अवस्था सध्या झाली आहे. बुरे काम का बुरा नतिजा, सून, भाई, चाचा, आ भतीजा, या नितीमुळेच ही गळती लागल्याची जहरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Baramati) यांनी केली. त्याचवेळी आघाडीच्या 15 वर्षात झाली नाहीत एवढी कामं आमच्या पाच वर्षात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Baramati) यांनी केला.
बारामतीत महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री बोलत होते. बारामतीत या यात्रेचं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंबासह राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. आपण बारामतीत येण्यासाठी निघताना या सभेच्या साऊंड सिस्टमवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यावरूनच राष्ट्रवादीने आपला किती धसका घेतला हे समजतंय. पण त्यांच्या या कृत्याने आमचा आवाज दाबला जाणार नाही, कारण आम्ही नरेंद्र मोदी यांचे बाशिंदे आहोत. आम्ही स्वतःची साऊंड सिस्टम घेऊन फिरतो, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
बारामतीत आता परिवर्तनाची हवा सुरु झाली आहे. आज होत असलेल्या सभेला झालेल्या गर्दीवरूनच लोकांची मानसिकता लक्षात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी महायुतीच्या माध्यमातून पाच वर्षात झालेल्या कामांचा आढावा घेतला. आघाडी सरकारच्या 15 वर्षाच्या काळात झाली नाहीत, इतकी कामं महायुतीच्या काळात पाच वर्षात झाल्याचा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची संभा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. एकच वादा, अजित दादा, अशी घोषणाबाजी त्यांनी केली.