मी पवारांना फोन केला नाही, उलट मला फोन आले, मी तोंड उघडलं तर….. : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis Newsroom Strike) सध्याच्या राजकीय घडामोडी, प्रचार, युती, आघाडी, ईडी अशा सर्व विषयांवर टीव्ही 9 च्या न्यूजरुममध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या.
मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलेला दावा धादांत खोटा, असत्य आहे. मी शरद पवारांना कधीही फोन केला नाही”, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Newsroom Strike) यांनी टीव्ही 9 मराठीच्या ‘न्यूजरुम स्ट्राईक’ या कार्यक्रमात केला. मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis Newsroom Strike) सध्याच्या राजकीय घडामोडी, प्रचार, युती, आघाडी, ईडी अशा सर्व विषयांवर टीव्ही 9 च्या न्यूजरुममध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या.
ईडीच्या कार्यालयात जाऊ नका यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला असा दावा शरद पवारांनी जाहीर सभेत केला होता. तो व्हिडीओ मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “हे धादांत असत्य, खोटं आहे. शंभर टक्के खोटं आहे. मी कधीही पवारसाहेबांना फोन केला नाही की तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊ नका. काही फोन मला आले, त्याबद्दल जर मी सांगितलं, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण मी काही राजकीय औचित्य पाळणाऱ्यांपैकी, राजकीय नीतीमत्ता पाळणाऱ्यांपैकी आहे. म्हणून त्याबद्दल मी सांगणार नाही, मी त्याबद्दल बोलणार नाही. पण मी कधीही पवारसाहेबांना फोन केला नाही की तुम्ही जाऊ नका”
महाराष्ट्र केसरी आम्हीच
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी “भाजप-शिवसेना युतीचं सरकारच पुन्हा सत्तेत येणार. येत्या 24 तारखेला जनताच सांगेल खरा पैलवान कोण? आम्ही विरोधकांना चारीमुंड्या चीत करुन, महाराष्ट्र केसरी आम्हीच असल्याचं दाखवून देऊ”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही पंतप्रधान मोदींच्या तालमीत तयार झालो आहे. आम्हीही पैलवानांचे वस्ताद आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
पवारांचा विवेक ढळला
“शरद पवार हे हातवारे, अंगविक्षेप करुन बोलत आहेत कारण ते मनातून हरले आहेत. जे मनातून हरतात त्यांचा विवेक ढळलेला असतो. त्यामुळेच तोल ढासळलेल्या मानसिकतेतून ते टीका करत आहेत. माझा विवेक जागरुक आहे, मी त्यांना त्या पातळीवर जाऊन उत्तर देणार नाही”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रवादीला अर्ध्या जागा पवारांचं राजकारण या पीढीला मंजूर नाही. आमचं राजकारण विकासाचं आणि विश्वासाचं आहे. गेल्यावेळपेक्षा अर्ध्याही जागा यावेळी राष्ट्रवादीला मिळणार नाहीत, त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
फिल्टर लावून प्रवेश काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या सगळ्यांना भाजपने घेतलं आहे. फिल्टर लावून पक्षप्रवेश दिला. सर्वांनाच प्रवेश दिला असता तर काँग्रेस-राष्ट्रवादीत केवळ एका हातावर मोजण्या इतकेच नेते राहिले असते, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. भाजपची शक्ती वाढल्याने लोक आमच्या पक्षात येत आहेत. भाजपमध्ये आलेले लोक परत जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नारायण राणे भाजपचेच
नारायण राणे यांचा भाजप प्रवेश कधी असा मला प्रश्न विचारला जातो. पण मला हेच कळत नाहीत, राणे हे भाजपच्या अर्जावर अडीच वर्षापासून राज्यसभेचे खासदार आहेत. जो माणूस भाजपचा खासदार आहे, त्याला प्रवेश देण्याची गरज आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.