काँग्रेसचा चक्रव्यूह भेदण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे ‘अभिमन्यू’ मैदानात
महत्त्वाचं म्हणजे औसा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. पण, मतदारसंघाच्या अदलाबदलीत आता हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलाय.
लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. कारण, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार (CM PA Abhimanyu Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे औसा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. पण, मतदारसंघाच्या अदलाबदलीत आता हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलाय. त्यामुळे काँग्रेसचा चक्रव्यूह अभिमन्यू पवार (CM PA Abhimanyu Pawar) भेदणार का? याकडे आता सर्वाचं लक्ष लागलंय.
गेल्या काही वर्षांपासून अभिमन्यू पवार हे औसामध्ये विकासकामं करत होते. त्यांनी आपला संपर्क देखील वाढवला होता. त्यानंतर आता उमेदवार म्हणून अभिमन्यू पवार औसाच्या जनतेला सामोरे जाणार आहेत. या काळात त्यांनी मतदारसंघातील जनतेमध्ये जाण्यासाठी मंत्रालयातून मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि जनतेची कामं केली.
औसा – काँग्रेसचा बालेकिल्ला
औसामध्ये बसवराज पाटील मुरूमकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बसवराज पाटील यांना 64237 मतं मिळाली. तर, शिवसेनेच्या दिनकर माने यांना 55,379 मतं मिळाली. पण, मोदी लाट असताना आणि स्बळावर लढत भाजपला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
2014 मध्ये भाजप उमेदवार पाशा पटेल यांना 37,414 मतं मिळाली. म्हणजेच काँग्रेस आणि भाजपमध्ये जवळपास 30 हजार मतांचा फरक दिसून येतो. पण, यंदा युती असल्याने भाजपला विजय मिळणार की काँग्रेस विजयी घोडदौड कायम राखणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
2009 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे दिनकर माने या ठिकाणावरून विजयी झाले. पण, 2009 आणि 2014 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. औसामध्ये 2014 च्या आकडेवारीनुसार एकूण मतदार हे 2,58,311 आहेत. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ही 1,38,497 आणि महिला मतदारांची संख्या 1,19,814 आहे. आपण मागील सहा वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडून येऊ, असा विश्वास अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केलाय.
विजयाचा दावा करणारे अभिमन्यू पवार हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पीए झाले. मागील पाच वर्षात त्यांनी 100 कोटींची विकासकामं केल्याचा दावा केला जातो.
शिवसेनेकडून औसा मतदारसंघ बदलण्यास मुख्यमंत्री यशस्वी देखील झाले. त्यामुळे अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीचा मार्ग देखील मोकळा झाला. पण, शिवसेना-भाजपपुढे खरं आव्हान असणार आहे ते काँग्रेसचा पराभव करणं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मतदारसंघात काँग्रेसचा चक्रव्यूह अभिमन्यू पवार भेदणार का? हे पाहावं लागणार आहे.