विधानसभेसाठी ‘या’ उमेदवारांना मिळणार तिकीट, महायुतीच्या बैठकीत मोठा निर्णय
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आता तिला जगाची आर्थिक राजधानी करायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी सांगितले.
Assembly election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच सध्या सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसोबतच राज्यातील विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
शनिवारी (27 जुलै) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्यांनीही या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली.
राज्यातही नदी जोड प्रकल्प सुरु करा
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आता तिला जगाची आर्थिक राजधानी करायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी सांगितले. महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प राबवण्यात यावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी दिला. मराठवाडा वॅाटर ग्रीड प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना राज्यातही नदी जोड प्रकल्प सुरू करण्याचे सूचना केली.
त्यासोबतच या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 1 लाख कोटींपेक्षा जास्त विकास नीधी मिळाला आहे. तसेच वाढवण बंदर आणि इतर पायाभूत विकास प्रकल्पांसाठी हा निधी देण्यात आला आहे.
महायुतीकडून मेरीटनुसार उमेदवारी दिली जाणार
तसेच येत्या काही दिवसात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवली जाणार आहे. यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रातील भाजपचे सर्वोच्च नेते यांची महत्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 मतदारसंघांच्या जागावाटपाची चर्चा होईल. यानुसार ज्या विधानसभा मतदारसंघात महायुतीतील ज्या पक्षातील उमेदवाराची जिंकण्याची क्षमता सर्वाधिक असेल, त्यालाच मेरीटनुसार महायुतीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी रणनिती या बैठकीत आखण्यात आली.
यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीतील दिल्लीत झालेल्या सर्व चर्चेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना दिली. आता भाजप जागावाटप कधी करते, याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.