मोठी बातमी | शिंदे-फडणवीस पंतप्रधानांना भेटणार, वेदांता प्रकल्पावर तोडगा काढणार- टीव्ही 9 सूत्र
आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट झाली. अर्ध्या तासाच्या या भेटीत वेदांत प्रकल्पावर चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यासह शिंदे आणि फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन पंतप्रधानांकडे वेदांता प्रकल्पाविषयी बोलणी करणार असल्याचं सांगण्यात येतंय.
मुंबईः वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला जाण्यावरून विरोधकांनी शिंदे-भाजप सरकारला चांगलंच घेरलं आहे. एकूणच हा प्रकल्प महाराष्ट्रातील सरकारसाठी प्रतिष्ठेचा विषय झालाय. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra DFadanvis) लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती टीव्ही 9 च्या सूत्रांनी दिली आहे. वेदांता प्रकल्पासाठीची पूर्ण प्लॅनिंग महाराष्ट्र सरकारने केली असून हा प्रकल्प इथेच व्हावा, यासाठी पंतप्रधानांकडे साकडं घातलं जाणार असल्याचं कळतंय. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट झाली. अर्ध्या तासाच्या या भेटीत वेदांत प्रकल्पावर चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यासह शिंदे आणि फडणवीस लवकरच दिल्लीत जाऊन पंतप्रधानांकडे वेदांता प्रकल्पाविषयी बोलणी करणार असल्याचं सांगण्यात येतंय.
विरोधकांकडून चौफेर टीका
वेदांता प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून बाहेर गेलाच कसा, या मुद्द्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलंय. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी कालपासून राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबई आणि पुण्यात आंदोलन करण्यात आलंय. दीड लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातेत पळवला गेला. केंद्र सरकारच्या दबावाखाली शिंदे सरकार आलंय, असा आरोप केला जातोय. तर युवासेनेकडून ‘खोके सरकारचा निषेध’ अशा बॅनर्सवर शेकडो तरुणांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत.
‘शिंदेंनी वजन वापरावं’
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटलं, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे यांनी आपलं वजन वापरावं. भाजपच्या कृपाशीर्वादामुळे त्यांचं सरकार आलंय तर त्याचा राज्यासाठी काही वापर करून घ्यावा, असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान महाविकास आघाडीमुळेच हा प्रकल्प गुजरातेत गेल्याचा आरोप शिंदे सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनी केला आहे.