राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं गिफ्ट, 3 टक्के महागाई भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल.

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारचं गिफ्ट, 3 टक्के महागाई भत्ता देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
सरकारी कर्मचारी (फाईल)
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 8:25 PM

मुंबई : राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर (Cabinet Meeting) केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होणार आहे. अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी (Government Employees) महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी करत होते. त्यांची ही मागणी आज पूर्ण झालीय. त्यामुळे गणपती उत्सवापूर्वी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा

दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. गणपती उत्सवापूर्वी खात्यात पैसे जमा झाल्यानं कर्मचारी आनंदात आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 4 टक्के वाढ केलीय. महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा केले आहेत. आता सरकार तिसरा हप्ता खात्यावर पाठवत आहे.

वैद्यकीय उपकरणे, औषधे खरेदीचे निर्देश

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश देण्यात आले. तसंच राज्यात स्वाईन फ्ल्यूमुळे आत्तापर्यंत 41 मृत्यू झाले आहेत. प्रादुर्भाव वाढत असून आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केलीय.

‘मुख्यमंत्री कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक घेणार’

कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत वेळीच पोहचले पाहिजे. कीड रोगाने पिकांचे मोठे नुकसान होते, यासंदर्भात कृषी विद्यापीठात होणारे संशोधन शेतकऱ्यांना कसे वेळीच मिळेल हे पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. लवकरच मुख्यमंत्री हे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठकही घेणार असल्याची माहिती देण्यात आलीय.