महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याच मतदान होत आहे. जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, नंदूरबार, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आज मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पैसे वाटपाचा आरोप केला आहे, तो ही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरतानाचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी पोस्ट केलाय. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानावेळी सुद्धा असेच पैसे वाटपाचे आरोप झाले होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पैसे वाटपाचे व्हिडिओ X वर पोस्ट केले होते. बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप झाल्याचा त्यांचा आरोप होता. आज सुद्धा मतदानाच्या दिवशीच पैसे वाटपाचा आरोप झालाय.
संजय राऊत यांनी X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओला ‘मुख्यमंत्री खाऊ घेऊनआले तो क्षण!’ असं कॅप्शन दिलय. ‘नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस पडतोय’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल पोलीस आहेत. त्यांच्या हातामध्ये काही बॅग दिसतायत. त्यावरुन संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ‘दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत?. यातून कोणता माल नाशिकला पोहचला?’ अस सवाल त्यांनी केलाय.
मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!
नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…
दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत?
यातून कोणतामाल नासिकला पोहचला?
निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे.
@ECISVEEP pic.twitter.com/2gOaPxVeZm— Sanjay Raut (@rautsanjay61) May 13, 2024
‘निवडणूक आयोगाकडून फालतु नाकाबंदी आणि झडत्या’
“निवडणूक आयोग फालतु नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे मैदानात आहेत. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे रिंगणात आहेत. काल पुण्यातही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पैसे वाटपाचा आरोप केला होता. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. पुण्यात सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर ते ठिय्या आंदोलनाला बसले होते.