Maharashtra Cabinet : शिंदे सरकारचं खातेवाटप लवकरच, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री बैठक; खातेवाटपावर चर्चा होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज रात्री बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता लवकरच कुणाला मंत्रिपद आणि कोणतं खातं मिळणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं. सोमवारी या सरकारनं विश्वासदर्शक ठरावही मोठ्या फरकारने जिंकला. त्यानंतर शिंदे सरकारचं खातेवाटप कधी? असा सवाल विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज रात्री बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता लवकरच कुणाला मंत्रिपद (Ministerial post) आणि कोणतं खातं मिळणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शिंदे, फडणवीसांमध्ये खातेवाटपाचं सूत्र ठरलं?
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं. मात्र, भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता खातेवाटपात कुणाचं पारडं जड राहणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, शिंदे आणि फडणवीस यांच्यात खातेवाटपाचं सूत्र ठरलं असल्याचं सांगितलं जात आहे. दर चार आमदारांमागे एक मंत्रिपद निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार शिंदे गटाला 14 ते 15 तर भाजपच्या वाट्याला 26 ते 27 मंत्रिपद येतील.
नगरविकास, एमएसआरडीसी मुख्यमंत्र्यांकडेच
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि एमएसआरडीसी खाते होते. आताही ही दोन्ही खाती शिंदे गटाकडेच ठेवली जाण्याची दाट शक्यता आहे. तर भाजपकडे गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती घेतली जातील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
अपक्ष आमदारांना लॉटरी
शिंदे मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं निश्चित आहे. पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणार की राज्यमंत्रीपद हे गुलदस्त्यात आहे. संजय शिरसाट हे सुद्धा सामाजिक न्याय विभागासाठी इच्छूक आहेत. आमदार आशिष जैस्वाल यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. जैस्वाल हे नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूरकर जैस्वाल यांच्यावर फडणवीस मेहरबान होतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं
माझी इच्छा आहे की सामाजिक न्याय या खात्यात एकतर अपंग कल्याण खातं वेगळं काढावं आणि ते ही पद आम्हाला मिळावं. ज्यातून जो दुर्लक्षित घटक आहे, ज्याचा भाऊही त्याच्याकडे पाहत नाही, त्यांची सेवा करण्याची काम जरी आम्हाला दिलं तरी आम्ही धन्यता मानू. ज्याचं बजेट जास्त ते खातं मोठं असं आम्ही समजत नाही. ज्यात सेवा करण्याची अधिक जास्त संधी आहे, अनेक वंचितांसोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळेल, अनेकांचे अश्रू पुसता येतील, हे जरी दिलं तरी आमची काही मागणी नाही, हट्ट नाही, आग्रह नाही. पण दिलं तर अधिक चांगलं काम कसं करता येईल, या सरकारची प्रतिमा अधिक मोठी कशी करता येईल, असं बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय.