Eknath Shinde : कोर्टातली लढाई आम्ही जिंकणार, भरत गोगावलेंचा दावा, तर खासदारांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील
शिवसेनेच्या कोर्टात जाण्याच्या निर्णयामुळे आमची काहीही अडचण झाली नाही, न्यायालयात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे ,ते त्या पद्धतीने करत आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.
मुंबई : शिवसेना (Shivsena MLA) नेमकी कुणाची आणि कोण बेकायदेशीर हा वाद सध्या कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात आज यावर सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आज ठाकरे गट आणि शिंदे गट (Eknath Shinde) हा सात दोन्ही गटांना दिलासा दिला आहे. यावर आता शिंदे गटाच्या आमदारांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आम्हाला जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे घडत चाललेलं आहे, आम्ही चुकीचं काही केलं नाही, दोन तृतीयांश मेजॉरिटी घेऊन आम्ही पुढे चाललो आहे, शिवसेनेच्या कोर्टात जाण्याच्या निर्णयामुळे आमची काहीही अडचण झाली नाही, न्यायालयात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे ,ते त्या पद्धतीने करत आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.
निर्णय आमच्या बाजुने येणार
मात्र फ्लोर टेस्ट झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव पारित झाला होता. सुप्रीम कोर्टात जी केस दाखल झाली तिचा आज फैसला होणार होता, परंतु पुढे मुदतवाढ दिलेली आहे. अनिश्चिततेप्रमाणे कधी बसवतील त्यासाठी आमची तयारी आहे, आम्हाला खात्री आहे हा निर्णय आमच्या बाजूने लागणार असा विश्वास ही भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे, तसेच आम्ही चुकीचं काही केलं नाही, आम्हाला न्याय देऊ त्यावर विश्वास आहे, असेही गोगावले म्हणाले आहेत.
सावंत कोर्टात का गेले मग?
तर अरविंद सावंत यांच्यावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले, त्यांचा जर न्यायलयावर विश्वास नसेल तर त्यांनी न्यायालयात जायला नको पाहिजे होतं. त्यांना खात्री नसेल तर त्या वाटेने का जावं? असा सवाल गोगावले यांनी सावंत यांना केला आहे. आम्हाला खात्री आहे आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे, आम्ही कुठलीही लढाईली जिंकायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.
खासदारांचा निर्णय शिंदे घेतील
तसेच किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत? असा सवाल गोगावले यांना करण्यात आल्यानंतर त्यावरील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .काही खासदार मुख्यमंत्री यांच्या संपर्कामध्ये असू शकतात याबाबत मला माहिती नाही. खासदार जर स्वतः शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असतील तर त्याबाबत शिंदे साहेब ठरवतील. शिंदेंकडे या बाबी सोपवलेल्या आहेत. शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया यावर गोगावले यांनी दिली आहे. तसेच बंडखोरांचा निर्णय कोणाला पटलेला असू दे किंवा नसू दे मात्र जनतेला हा निर्णय पटलेला आहे आणि जनता जनार्दन सर्वोच्च स्थानी आहे, असेही उगवले म्हणाले.