‘वर्षा’ निवासस्थानावर सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री खलबतं, तिढा कुठे अडला?; एका आमदाराच्या अचानक हजेरीने भुवया उंचावल्या
अजित पवार हे युतीत आल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यातच आता अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं दिलं जाणार असल्याने ही अस्वस्थता अधिकच वाढली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध केला आहे.
मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे. या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथही देण्यात आली आहे. मात्र, आठ दिवस उलटले तरी या आमदारांना अद्याप खाती देण्यात आलेली नाही. तसेच शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचाही मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. त्यामुळे आमदारांमध्ये चलबिचल आहे. त्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी वर्षावर खलबतं सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. तब्बल दोन तास ही बैठक चालली. या बैठकीत काही गोष्टींवर अंतिम हात फिरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. काल रात्री 11 वाजता ही बैठक सुरू झाली. ती मध्यरात्री 1 वाजता संपली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच खाते वाटपावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. युती सरकारमध्ये राष्ट्रवादीचा एक गट आल्याने या गटाला कोणती मंत्रिपद द्यायची आणि कोणती खाती द्यायची यावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
घोडं कुठं अडलं?
अजित पवार हे युतीत आल्याने शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यातच आता अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं दिलं जाणार असल्याने ही अस्वस्थता अधिकच वाढली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध केला आहे. त्यामुळेच मंत्र्यांचं खातं वाटप रखडल्याचं सांगितलं जात होतं. पण आता हा तिढा सुटला आहे. अर्थखातं अजित पवार यांनाच देण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र आता इतर खात्यांवरून घोडं अडल्याचं सांगितलं जात आहे.
आमदाराच्या एन्ट्रीने भुवया उंचावल्या
दरम्यान, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये खाती वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे आमदार दिलीप ऊर्फ मामा लांडे हे वर्षावर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मामा लांडे हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले होते, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरच चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री लवकरच त्याबाबत निर्णय घेतील. मी आतमध्ये होतो. माझ्या विभागातील काही कामे होती. त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो, असं मामा लांडे यांनी सांगितलं.
दरम्यान, काँग्रेसच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई महानगर पालिकेच्या वार्ड क्रमांक 79 चे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सदानंद वामन परब यांनीही शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती हा प्रवेश झाला. यावेळी मामा लांडेही उपस्थित होते. तसेच मुंबईतील चांदीवली येथील डॉ. रवींद्र सीताराम म्हस्के यांच्यासह 500 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.