“आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार”, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा...
गुवाहाटी : आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन (Chhatrapati Shivaji Maharaj Sanskrutik Bhavan) उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. तर महाराष्ट्रातही आसाम भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. गुवाहाटी दौऱ्या दरम्यान त्यांनी ही घोषणा केलीय.
एकनाथ शिंदे यांची आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांची रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमध्ये महाराष्ट्र आणि आसाम राज्यामध्ये परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत तसेच या दोन राज्यात उद्योग, व्यापार, पर्यटनात वाढ व्हावी यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर असून त्यांच्यासह आलेले आमदार, खासदार, पदाधिकारी यांची सारी व्यवस्था आसाम सरकारने केली होती.तसेच राज्यात सत्ता स्थापना झाल्यावर पुन्हा एकदा गुवाहाटीला येण्याची विनंती देखील केलेली होती, त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शर्मा यांनी या सर्वांसाठी खास प्रीतीभोजनाचं आयोजन केलं होतं.
यावेळी शर्मा यांनी राज्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटूंबियांची आस्थेने विचारपूस केली. तब्बल दोन तास हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना खास गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच आता एकदा महाराष्ट्राचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी सरमा यांनी नक्की यावे असे सांगून त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सत्ता संघर्षाचा काळात सलग 11 दिवस गुवाहाटी मध्ये होतो मात्र तेव्हा सगळ्यांच्या मनावर प्रचंड दडपण होतं, मात्र आता हे दडपण दूर झाले असून तेव्हा ज्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते त्याच कामाख्या देवीचे आज मुख्यमंत्री बनून पुन्हा दर्शन घेताना एक वेगळंच समाधान मिळालं असल्याचे उद्गार काढले. या केलेल्या मदतीतून उतराई होणं शक्य नसले तरीही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नवी मुंबईमध्ये आसाम भवन बांधायला शिंदे यांनी होकार दिला, तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आसाम सरकारने जागा देण्यास तयार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी जाहीर केलं.