Eknath Shinde : “फक्त 50 खोके? कसले बॉक्स? मिठाईचे का?” एकनाथ शिंदेंनी उडवली राऊतांची खिल्ली
फक्त 50 खोके? कसले बॉक्स? मिठाईचे का?-एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : “फक्त 50 खोके… खोके कसले… मिठाईचे… गंमतीचा भाग जाऊ द्या. 40 अधिक 10 हे 50 आमदार लाखो लोकातून निवडून आलेले आहेत. साधा ग्रामपंचायत सदस्य पक्ष बदलत नाही. इकडे आमदार एवढ्या प्रमाणात आले”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेना खासदार संजय राऊतांची (Sanjay Raut) खिल्ली उडवली. नाशिकमध्ये बोलताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थ आमदारांवर टीका केली. खोकी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
राऊत काय म्हणाले होते?
बांद्यापासून चांद्यापर्यंत फाटक्या शिवसैनिकांनी या धनिकांचा पराभव केला आहे. हा इतिहास आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ते तिथे गेलेत. पण ते स्वस्थ नाहीयेत. त्यांना झोप लागत नाहीये. खोकी मिळाली म्हणून झोप लागते असं नाही. शिवसैनिकांची हाय आहे. बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून. नुसता फोटो लावला बाळासाहेबांचा आणि आमचे म्हटल्यावर आमचे होत नाहीत. त्यांनी आशीर्वाद द्यावा लागतो. ही पवित्र भूमी आहे. त्यावर आक्रमण चालत नाही. असे आक्रमण येतात आणि जातात. आमच्यात जिगर आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांसहीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसैनिक टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद देत होते.
“सरकार स्थापन करण्यात फडणवीसांचं मोठं योगदान आहे. राज्याच्या विकासासाठी सदिच्छा भेटी घेतल्या. देशात आणि राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. किंबहुना जगाने दखल घेतली आहे. पण आमची जबाबदारी वाढली आहे. सर्वांना न्याय द्यायचा आहे. आमचा एक प्लसपॉइंट आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि जलयुक्त शिवार हे प्रकल्प आम्ही पुढे नेणार आहोत. राज्याला गतवैभव आणून देऊ. कारण हे प्रकल्प मधल्या काळात रखडली होती. हे सामान्य लोकांचे प्रकल्प आहेत”, असंही शिंदे म्हणाले आहेत.