लाडकी बहीण योजना कधीपर्यंत सुरू राहणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेटच सांगितलं
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता महिलांना एकत्रित मिळाला आहे. आता या योजनेचा जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. या योजनेच्या प्रचारासाठी सभा घेतल्या जात आहे. आज नागपुरात या योजनेची माहिती देण्यासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
लाडकी बहीण योजनेबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लाडकी बहीण योजना ही फक्त काही रक्षाबंधन किंवा भाऊबीज पाहून आणलेली नाही. ही योजना कायमस्वरुपी सुरू राहणार आहे. या योजनेबाबत कोणतीही चिंता बाळगू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं. नागपुरात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
विरोधक तुम्हाला काहीही सांगतील. त्यावर विश्वास ठेवू नका. ही योजना फक्त रक्षाबंधनासाठी नाहीये. ही योजना फक्त भाऊबीजेसाठीही नाही. ती कायम राहणार आहे. कुणी काहीही म्हटलं तरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असं सांगतानाच एकीकडे आम्ही राज्यात विकासाची कामे करत आहोत. तर दुसरीकडे आम्ही लोककल्याणकारी योजनाही राबवत आहोत. या योजनांमधून गोरगरीब आणि महिलांचं सक्षमीकरण करायचं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही दोन वर्षात जी कामे केली. ती लक्षात ठेवा आणि तुमचे आशीर्वाद महायुतीच्या पाठी राहू द्या, असं आवाहनही त्यांनी केलं.
महिलांना लखपती करणार
ही योजना हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर तर अजून बाकी आहे. तुम्हाला पैसे देताना आम्ही हात आखडता घेणार नाही. या बहिणींना लखपती करण्याचं आमचं स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजना सुरू केली आहे. ही योजना आम्ही राबवणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून आम्ही राज्यात जवळपास 50 लाख महिलांना लखपती करणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
फक्त दीड हजार नाही…
लाडकी बहीण योजनेतून महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. पण आम्ही फक्त दीड हजार रुपयांवर थांबणार नाही. आम्ही या योजनेचा विस्तार करणार आहोत. तुमची आम्हाला साथ राहिली तर आम्ही 2500 ते 3 हजार रुपये सुद्धा तुम्हाला देऊ. एवढं तुम्हाला सांगतो, असंही त्यांनी सांगितलं.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पैशाचं वाटप करण्यात आलं याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. पहिल्या टप्प्यात आपण आतापर्यंत 1 कोटी 7 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. 3 हजार 225 कोटी रुपये बहिणींच्या खात्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात 52 लाख बहिणी लाभार्थी आहेत. त्यांना आपण 1 हजार 562 कोटी रुपये वितरीत केले आहेत. म्हणजेच आपण 1 कोटी 60 लाखापर्यंत पोहोचलो आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
तीन कोटीपर्यंत आकडा गेला तरी हरकत नाही
या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींचा आकडा अडीच कोटीपर्यंत जाणार आहे. अडीच काय तीन कोटीपर्यंत हा आकडा गेला तरी चालेल. काही हरकत नाही. आम्ही तिन्ही भाऊ सक्षम आहोत. आपल्या बहिणींना आम्ही भरभरून भेट देणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.