सावरकरांबद्दल ‘असं’ बोलणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधी यांना इशारा

| Updated on: Nov 17, 2022 | 11:10 AM

हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.

सावरकरांबद्दल असं बोलणं खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधी यांना इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सणकून टीका केली आहे. वीर सावरकर (Veer Sawarkar) यांच्याबद्दल टिप्पणी करणाऱ्या राहुल गांधींना (Rahul Gandhi) त्यांनी कडक शब्दात इशारा दिलाय. महाराष्ट्रातील जनता हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान सहन करू शकत नाहीत. सावरकर स्मारकात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलंय..

राहुल गांधी यांना इशारा देतानाच एकनाथ शिंदे यांनी शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. पण काही लोकांनी हे सहन केलं.. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला.

मुख्यमंत्री म्हणाले, वीर सावरकरांचा अनेकदा अपमान झाला. त्यांना माफीवीर म्हटलं गेलं…. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. फडणवीस यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता योग्य उत्तर देईल. राहुल गांधींना सावरकरांबदद्ल माहिती नाही. ते रोज खोटं बोलतात. किती काँग्रेस नेत्यांनी सावरकरांप्रमाणे ११ वर्ष यातना सहन केल्या, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना केला. या अपमानाचं उत्तर महाराष्ट्राची जनताच देईल, असं फडणवीस म्हणाले.

तर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राच थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली.

राहुल गांधींचं वक्तव्य काय?

मंगळवारी वाशिम येथे भारत जोडो यात्रेदरम्यान, राहुल गांधींनी सावरकरांबाबत वक्तव्य केलं. ते म्हणाले, सावरकर इंग्रजांकडून पेंशन घेत होते. काँग्रेसच्या विरोधात इंग्रजांसाठी काम करत होते. ते दोन-तीन वर्ष अंदमानच्या तुरुंगात राहिले. इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि काम करायला तयार आहे, असं म्हणाले.