हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील चार विकासकामांचं (Development works) उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर संध्याकाळी एकनाथ शिंदे हिंगोलीत दाखल झाले. आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत शिंदे यांनी उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी जाहीर सभेदरम्यान व्यासपीठावर असा एक प्रसंग घडला की, त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साधेपणा दिसून आला.
व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक स्पेशल खुर्ची ठेवण्यात आली होती. तर अन्य उपस्थितांना वेगळ्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यावेळी त्यांनी आपल्यासाठी ठेवण्यात आलेली वेगळी खुर्ची व्यासपीठावर काढण्यास सांगितलं. सर्वांना ज्या प्रकारच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या तशीच खुर्ची आपल्यासाठीही असावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर सर्वांना असलेल्या खुर्ची प्रमाणेच शिंदे यांनाही खुर्ची देण्यात आली आणि त्या खुर्चीवर शिंदे बसले. एकनाथ शिंदे आपल्या अनेक भाषणात सांगतात की मी एक सामान्य शिवसैनिक आहे आणि सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती. आजच्या या प्रसंगानं एकनाथ शिंदे यांच्यातील सामान्य किंवा साधेपणा दिसून आला.
मंगळवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांना पक्षश्रेष्ठींकडून सकाळीपासून फोन गेले आहेत आणि त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मंत्रिपदासाठी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश आहे. तर शिंदे गटाकडून आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांची नावं समोर आली आहेत.