Eknath Shinde : खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटाच्या वाटेवर, लोखंडे म्हणतात आम्ही उद्धव साहेबांना…
आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या वक्तव्याने आता नवा संभ्रम निर्माण झाला आहे.
शिर्डी : तब्बल 40 आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत बंड करत उद्धव ठाकरे यांना पहिला झटका दिला. हा झटकाच एवढा मोठा होता की त्यात ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) वावटळीत कोसळलेल्या झाडासारखं कोसळलं. त्यानंतर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. हे नव सरकार एकनाथ शिंदे आणि भाजप युतीचं आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेतले 40 तर अपक्ष 10 आमदाराच्या आसपास असे तब्बल 50 आमदारांचा (Shivsena MLA) आकडा आहे. त्यानंतर आता अनेक बड्या नेत्यांची ही एकनाथ शिंदे गटाकडे रीघ लागली आहे. नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबईतील पदाधिकारी आधीच एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर गेले आहेत. आज सोलापुरात ही तशीच काहीशी स्थिती दिसून आली आहे. त्यानंतर आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या वक्तव्याने आता नवा संभ्रम निर्माण झाला आहे.
आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटात जाणार?
शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा आहेत. शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे भाजपा-सेनेच्या युतीत निवडून आलेले आहेत. सुरूवातीपासूनच लोखंडेंनी भाजपासोबत युती करायला हवी अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. उद्धवजींबरोबर झालेल्या बैठकीत भाजप सोबत युती व्हावी असे मत खासदारांचे होते. त्यामुळे आता शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आम्ही पंधरा खासदारांनी भाजपासोबत जाण्याची सातत्याने भूमिका मांडली आहे. उद्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आम्ही आपलं म्हणणं माडंणार असल्याचं सदाशिव लोखंडे यांनी सांगितलंय.
अनेक खासदारांसोबत बैठका झाल्याच्या चर्चा
एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यापासून सतत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरेही बाहेर पडत, निष्ठा यात्रा काढत जागोजागी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत आणि शिवसेनेला लागलेली गळती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इकडे मोठे नेतेच ठाकरेंचं टेन्शन पुन्हा वाढवताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक खासदारांनी जाऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची भेट घेतल्याच्या ही चर्चा बाहेर आल्या.
शिंदे-फडणवीस काय म्हणाले?
तर श्रीकांत शिंदे हे आधीपासूनच शिंदे गटासोबत आहेत. खासदार भावना गवळी शिवसेनेच्या कुठल्या बैठकीला आतापर्यंत दिसून आल्या नाहीत. त्यामुळे उरलेले शिवसेना खासदार काय निर्णय घेणार? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. याबाबत दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना हे विचारण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्या संपर्कात एकही खासदार नाही. असे शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. मी आता मुख्यमंत्री झालो आहे, त्यामुळे ते मला कामानिमित्त भेटायला येतात, शुभेच्छा द्यायला येतात. मात्र कोणत्याही बैठकीबाबत मला काही माहिती नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले होते. तर दुसरीकडे त्याच प्रश्नाची फडणवीसांनी आमच्या संपर्कात एक खासदार आहे, त्यांचं नाव श्रीकांत शिंदे आहे, असे म्हणत खिल्ली उडवली होती.