ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांना ‘लाडकी बहीण’ काय कळणार?; मुख्यमंत्र्यांची तुफान टोलेबाजी
रोज उठून म्हणता उद्योग पळाले. बाबा कोणाच्या काळात उद्योग आले? हे मी चॅलेंजने सांगतो. अडीच वर्षाच बैठकाच न झाल्याने किती उद्योग येऊ शकले नाही ते सांगा. होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पानी का पानी, असं आव्हानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ का नाही? लाडका भाऊ योजना आणायला काही हरकत नाही. सरकारने मुलं आणि मुली यात भेदभाव करू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. काही लोक म्हणाले भावाचं काय? ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, त्यांना लाडकी बहीण योजना कशी कळणार?, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना हा हल्ला चढवला.
आम्ही जनतेला काही द्यायचं ठरवलं तर विरोधकांच्या पोटात का दुखतं? तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कौतुक करता येत नसेल तर बिनबुडाची टीका करू नका. आम्ही माताभगिनींना घरचा आहेर दिला आहे. लाडक्या बहीण योजनेत एखाद्या व्यक्तीने भगिनींनकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला सस्पेंड केलं जाईल. कोणी असं केलं तर त्याला तुरुंगात टाकू, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
त्यांच्या पोटातच दुखतं
माता भगिनींचा सन्मान करणं ही आपल्या राज्याची संस्कृती आहे. काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजना आणली. भावाचे काय? ज्यांना सख्खा भाऊ समजला नाही. त्यांना योजना तरी कशी कळणार?, असा टोला लगावतानाच ज्या घरातली लक्ष्मी सुखी, त्या घरात समृद्धी पक्कीच समजा. आपण मुलींचं संपूर्ण उच्च शिक्षण मोफत करणार आहोत. आपण कुणाला काही द्यायचं ठरवलं तर यांच्या पोटात दुखू लागतं. त्यांना द्यायची माहिती नाही. त्यांचं मन निर्मळ नाही. नाही निर्मळ मनं, काय करेल साबणं, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
हे सरकार पळणारं नाही
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. कोव्हिड काळात त्यांना आषाडी वारी बंद केली. मला बजेट कळत नाही म्हणतात आणि नंतर त्यावर बोलतात. टीका करतात. असा मुख्यमंत्री राज्याने पाहिला नाही. हे सरकार पळणारं नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं.
वाण नाही, पण गुण लागला
राज्याची प्रगती सुरु आहे. विरोधकांनी टीका सुरू केली आहे. जयंतराव अर्थमंत्री होते तेव्हा पण तिथेच होतो. मला वाटलं तुम्ही तरी खरं बोलालं पण नव्या मित्राच्या संगतीत गुण नाही पण वाण लागला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना लगावला.