सिंधुदुर्ग : राज्यात शिवसेना आमदारांचं (Shivsena MLA) ऐतिहासिक बंड झालं. ज्या बंडामुळं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) गेलं आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप युतीचा सरकार आलं. एवढा मोठं बंड राज्याने कदाचितच पाहिलं असेल. या बंडाने राजकारणाची दिशा बदलून टाकली. पुन्हा एकदा दोन समविचारी पक्ष एकत्र येत असल्याचे सांगण्यात आलं आणि आम्हाला मुबलक निधी मिळावा, शिवसेना वाचावी यासाठी हे करत असल्याचे एकनाथ शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आलं. तसेच आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना असेही शिवसेना आमदार सांगत आहेत. आता सर्व आमदार ज्याच्या त्याच्या मतदार संघात पोहोचलेत. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर हे आपल्या मतदारसंघात पोहोचले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विषयी बोलताना केसरकारांना हुंदका आवरला नाही. या घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
ही बंडाची लढाई जिंकून आणि नवं सरकार स्थापन झाल्यापासून दीपक केसरकर हे पहिल्यांदाच मतदार संघात पोहोचल्याने लोकांकडून मोठ्या उत्साहाने त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी केसरकारांच्या आणि बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे जाहीर पणे स्वागत ही करण्यात आलं. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघात जातो असं सांगितलं. त्यावेळी आवश्यकता असल्यास मीही तुमच्या मतदारसंघात येतो असे म्हणणारा मुख्यमंत्री पहिल्यांदाच महाराष्ट्राला लाभला आहे. असे म्हणत दीपक केसरकर यांना एकनाथ शिंदे यांची आठवण सांगताना रडू कोसळलं. आपल्या नेत्याविषयी एवढा जिव्हाळा पाहून कार्यकर्तेही सुखावले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात दीपक केसरकर यांनीही मोठी निर्णायक भूमिका बजावली आहे. गुवाहाटीत असल्यापासून दीपक केसरकर हेच एकनाथ शिंदे गटाची बाजू सतत मीडिया समोर मांडत आहेत. पत्रकार परिषदा घेत आहेत. तसेच विरोधकांना सडेतोड उत्तरही देत आहेत. गुवाहाटी ला पोहोचल्यानंतरच आमदार दीपक केसरकर यांच्याकडे मुख्य प्रवक्त्याची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सतत खिंड लढवत आहेत. सध्या कोकणात दीपक केसरकर आणि राणे यांच्यात शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळते आहे. निलेश राणे यांनी आता पुन्हा ट्विट करत केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. हा संघर्ष सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेते. आधी केसरकरांनी राणे पुत्रांना लहान म्हटलं होतं. आता हा वाद वाढला आहे.